
दोडामार्ग : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी एकाही उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केले नाही. मात्र ६६ उमेदवारी अर्ज विक्रीस गेल्याची माहिती तहसीलदार राहुल गुरव यांनी दिली.
१६ जानेवारी ते २१ जानेवारी या कालावधीत उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची संधी उपलब्ध असून निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे. नामनिर्देशन प्रक्रियेच्या पहिल्या दिवसापासून ते तिसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत एकाही उमेदवाराने आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले नाही. पहिल्या दिवशी दहा, दुसऱ्या दिवशी १८ व चौथ्या दिवशी ३८ नामनिर्देशन पत्रांची विक्री झाल्याचे तहसीलदार राहुल गुरव यांनी सांगितले. तर तिसऱ्या दिवशी रविवार असल्याने अर्जांची विक्री बंद होती. नामनिर्देशन दाखल करण्यासाठी आता केवळ दोन दिवस शिल्लक असून, आगामी दिवसांत मोठ्या संख्येने उमेदवार अर्ज दाखल करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.










