
दोडामार्ग : होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्याला भेट देऊन कायदा व सुव्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीसह तालुक्यातील संवेदनशील ठिकाणांची माहिती जाणून घेतली.
निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तालुक्याच्या सर्व सीमा तपासणी नाक्यांवर ये-जा करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करण्यात येणार असल्याचे डॉ. दहीकर यांनी स्पष्ट केले. संशयास्पद हालचालींवर कडक लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, दोडामार्गच्या मुख्य बाजारपेठेतील सध्या बंद अवस्थेत असलेले सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे बाजारपेठेतील सुरक्षेला बळ मिळणार असून गुन्हेगारी घटनांना आळा बसण्यास मदत होणार आहे. यावेळी त्यांनी दोडामार्ग पोलीस ठाण्याच्या पायाभूत सुविधांबाबतही महत्त्वपूर्ण माहिती दिली.
सध्या नूतन पोलीस ठाणे उभारण्यासाठी उपलब्ध जागा अपुरी पडत असल्याने, सुसज्ज आणि प्रशस्त जागा उपलब्ध झाल्यास नवीन पोलीस ठाणे उभारण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र व सुसज्ज कॉटर्स उभारण्याबाबतही सकारात्मक विचार सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.










