पाणी संवर्धन काळाची गरज : सरपंच आकांक्षा चव्हाण

म्हापण येथे जल जीवन मिशन अंतर्गत प्रशिक्षण शिबीर संपन्न
Edited by: दिपेश परब
Published on: June 21, 2023 12:38 PM
views 210  views

 वेंगुर्ला : भविष्यात पाणी टंचाईचा सामना करायचा असेल व गावात मुबलक प्रमाणात पाणी साठे ठेवायचे असतील तर पाणी संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन म्हापण सरपंच आकांक्षा चव्हाण यांनी केले. येथील जल जीवन मिशन अंतर्गत आयोजित प्रशिक्षण शिबिराच्या वेळी सौ चव्हाण बोलत होत्या. 

   जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जिल्हा परिषद सिंधुदुर्ग,  जे.पी.एस फाउंडेशन लखनऊ व पंचायत समिती, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत मेढा, म्हापण, कोचरे, कुशेवाडा, भोगवे, चीपी, परुळे व वायंगणी या गावातील आशा, अंगणवाडी सेविका, जलसुरक्षक, सीआरपी व ग्रामीण पाणी पुरवठा स्वच्छता समिती सदस्य यांचे दोन दिवशीय अनिवासी प्रशिक्षण शिबिर ग्रामपंचायत म्हापण येथे १६ व १७ जून रोजी संपन्न झाले.

    या कार्यक्रमास जलजीवन मिशन परिचय, ग्राम स्तरावरील विविध भागधारांची भूमिका व जबाबदारी इत्यादी बाबत मास्टर ट्रेनर संतोष पाटील यांनी मार्गदर्शन केले. तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे बळकटीकरण व स्त्रोतांचे प्रभावी व्यवस्थापन सर्वेक्षण व सुरक्षित पाणी पुरवठा याबाबत मास्टर ट्रेनर सचिन कदम यांनी माहिती दिली. पाणी योजनांची देखभाल दुरुस्तीबाबत ग्रामस्तरीय नियोजन प्रक्रिया व साधने याबाबत पाणीपुरवठा व स्वछता विभाग समन्वयक प्रज्ञा सावंत यांनी मार्गदर्शन केले. तसेच पाण्याच्या रासायनिक तपासणीचे प्रात्यक्षिकाद्वारे माहिती बीआरसी द्रौपदी नाईक यांनी दिली. या प्रशिक्षणाचा लाभ पंचक्रोशीतील प्रशिक्षणार्थींनी घेतला. 

   यावेळी या प्रशिक्षणाचा लाभ विविध प्रवर्गातील सदस्यांनी घेऊन आपल्या गावातील जलजीवन मिशन अंतर्गत सर्व योजना यशस्वी कराव्यात असे आवाहन प्रज्ञा सावंत सल्लागार पाणी पुरवठा व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी केले.