
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील सहा विविध ठिकाणी जलस्रोतांची स्वच्छता व संवर्धन करत जलरक्षणाचा संदेश देणारा उपक्रम उत्साहात पार पडला. संत निरंकारी मंडळच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ अभियानाच्या चौथ्या टप्प्यात शेकडो स्वयंसेवकांनी सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा सामूहिक संकल्प दृढ केला. याबाबतची माहिती संत निरंकारी मंडळ, सिंधुदुर्गचे मिडिया सहाय्यक अजिंक्य मुसळे यांनी दिली.
सतगुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील २५ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ९३० शहरांमधील १६०० हून अधिक ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला. सुमारे १२ लाख स्वयंसेवकांनी यात सहभाग नोंदविला. जलसंवर्धनासोबतच समाजात स्वच्छता व पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा या अभियानाचा उद्देश आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुळस (ता. वेंगुर्ले) येथील गिऱ्याचे गाळव, पावशी (ता. कुडाळ) येथील मिटक्याचीवाडी तलाव घाट, कणकवली येथील गड नदी परिसर, वैभववाडी येथील शांती नदी, गिर्ये कॅन्टीन तसेच विजयदुर्ग चौपाटी (ता. देवगड) आदी ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्लास्टिक, काच तसेच ओला व सुका कचरा वेगवेगळा करून स्थानिक नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या सहकार्याने त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
आयोजित विशेष सत्संगात सतगुरू माता सुदीक्षा जी महाराज यांनी भक्ती ही केवळ शब्दांत न राहता आचरणातून दिसली पाहिजे, असे सांगितले. निरंकारी बाबाजींच्या शिकवणीचे पालन कृतीतून करणे हीच खरी श्रद्धांजली असल्याचे त्यांनी नमूद केले. सेवा, सुमिरण आणि सत्संग यांचा संगम साधत मानवाला निसर्गाबद्दल अधिक संवेदनशील बनविणे, हा या अभियानामागील मुख्य हेतू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
या उपक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक, सरपंच व उपसरपंच यांनीही उपस्थिती दर्शवून स्वयंसेवकांचे कौतुक केले. जलरक्षणाच्या माध्यमातून पर्यावरण संतुलन टिकविण्याचा संदेश देत हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.











