कुडाळ नगरपंचायतीचा ३७ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प सादर

शहर विकासावर दिला भर
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: February 24, 2026 18:07 PM
views 38  views

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या विशेष सभेत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा शिलकी अर्थसंकल्प मंगळवारी सर्वानुमते मंजूर करण्यात आला. नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता अशोक बांदेकर-शिरवलकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विविध लोककल्याणकारी योजनांसाठी महत्त्वपूर्ण तरतूद करण्यात आली आहे.

आर्थिक स्थिती एका दृष्टिक्षेपात लेखापाल श्री. स्वप्निल पाटील यांनी वाचन केलेल्या अर्थसंकल्पाची प्रमुख आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

प्रारंभिक शिल्लक ३७ कोटी ८१ लाख ५९ हजार ८४८

एकूण महसुली जमा १० कोटी ३० लाख ५२ हजार ५००

एकूण महसुली खर्च १० कोटी २७ लाख ४१ हजार ७४९

एकूण भांडवली जमा २५ कोटी ४४ लाख ५६ हजार ५००

एकूण भांडवली खर्च २५ कोटी ३२ लाख १८ हजार ५००

अखेरची शिल्लक ३७ कोटी ९७ लाख ०८ हजार ५९९

या अर्थसंकल्पात आरोग्य, पाणी, क्रीडा, स्वच्छता, महिला व बालकल्याण, दिव्यांग बांधव सक्षमीकरण आणि ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी विशेष निधी राखून ठेवण्यात आला आहे.

शहर सुशोभीकरण: चौक सुशोभीकरण आणि शहराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे बांधकाम.

पायाभूत सुविधा: मुख्य रस्ते काँक्रीटीकरण, रस्ता दुरुस्ती, हायमास्ट दिवे आणि जलतरण तलाव.

क्रीडा व आरोग्य: स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, सुसज्ज जिमखाना आणि 'नाना-नानी पार्क'ची निर्मिती.

स्वच्छता व पर्यावरण: कचरा डेपो, नवीन कचरा संकलन वाहने, सक्शन मशीन आणि बायोगॅस प्लँट.

सार्वजनिक सुविधा: नाट्यगृह बांधकाम, नवीन भाजी मार्केट, मच्छी मार्केट आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी मलनिस्सारण योजना.

या विशेष सभेला मुख्याधिकारी श्री. विनायक औंधकर, सर्व नगरसेवक, नगरसेविका आणि विभागाचे प्रमुख कर्मचारी उपस्थित होते. नागरिकांना हा अर्थसंकल्प पाहण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.