
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित व गंभीर प्रश्नांबाबत आवाज उठविण्यासाठी भारतीय किसान संघ यांच्या वतीने गुरुवार, दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ओरोस एसटी स्टँड ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार असून, त्यानंतर माननीय जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे.
संघटनेने मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये ई-पीक पाहणी ॲप (DCS-Version 4.0) मधील तांत्रिक त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना होणारा त्रास थांबविणे, मनरेगातील प्रलंबित प्रकरणांना तातडीने मंजुरी देणे, तसेच भात खरेदी केंद्रांवरील अनियमितता थांबविणे यांचा समावेश आहे. भात खरेदी केंद्रे १ डिसेंबरपूर्वी सुरू करावीत आणि प्रति गुंठा खरेदी मर्यादा वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय नादुरुस्त सोलार पंप दुरुस्त करून शेतकऱ्यांना सक्तीऐवजी त्यांच्या मागणीनुसार वन फेज किंवा थ्री फेज वीज जोडणी द्यावी, सोलार पंपाची सबसिडी थेट शेतकऱ्यांना मिळावी, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे. अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या शेती नुकसानीवर तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच हवामान बदलामुळे काजू व आंबा पिकांना होत असलेल्या नुकसानीचा पिक विम्यात समावेश करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. देशी गोवंश पालनासाठी गोसखी/गोसखा यांना प्रोत्साहन निधी द्यावा, अशीही मागणी संघटनेने केली आहे.
“शेतकऱ्यांनी स्वतःच्या प्रश्नांसाठी स्वतः नेतृत्व करत मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे,” असे आवाहन जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी केले आहे.










