दोडामार्गात धो धो ; झाडे पडली, गटार तुंबले

बांधकामची अनास्था मनस्ताप देणारी
Edited by: संदीप देसाई
Published on: July 03, 2023 13:36 PM
views 66  views

दोडामार्ग : गेला आठवडाभर संततधार बरसणाऱ्या पावसाने रविवारी दुपारनंतर दोडामार्गला अक्षरक्ष: झोडपून काढले. परिणामी तुंबलेले गटार आणि धोकादायक झाडे रस्त्यावर कोसळून नागरिकांची धांदल उडाली. रविवारी दुपारनंतर सायंकाळी उशिरा पर्यंत दोडामार्ग शहरासह संपूर्ण तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.


दोन तीन तास सलग कोसळत राहिलेल्या पावसाने अनेक ठिकाणी बांदा दोडामार्ग व दोडामार्ग तिलारी राज्यमार्गवर झाडे उन्मळून पडणे. आणि गटारांचे योग्य व्यवस्थापन बांधकाम खात्याने न केल्याने राज्यमार्ग पाण्यात बुडल्याच चित्र निर्माण झालं होत. दोडामार्ग शहरापासून अगदी २०० मीटर अंतरावर बँक ऑफ महाराष्ट्र शाखेसमोर राज्यमार्ग गटर खुले न केल्याने या ठिकाणी सायंकाळी राज्यमार्गवर पूरस्थिती निर्माण झाली होती. सायंकाळची वेळ असल्याने याच फूट - दोन फूट पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू होता. येथे गतवर्षी आणून टाकलेले सिमेंट पाईप गटारात आवश्यक ठिकाणी मोरी करीता न टाकल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप करत सुभाष दळवी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

  तर सासोली येथे मराठी शाळेजवळ  भले मोठे सुकलेले आकेशी झाड रस्त्यावर उन्मळून पडल्याने या राज्य मार्गावर बराच काळ वाहतूक ठप्प राहिली. ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी यावेळी तहसीलदार यांचे लक्ष वेधले. व हे झाड हटवण्यास मदत केली. तर तहसीलदार खानोलकर यांनी बांधकाम ला याठिकाणी जेसिबी पाठवून रस्ता मोकळा करण्याची सूचना केली. मात्र नेहमी प्रमाणे बांधकाम खाते सुशेगात राहिल्याने नागरिकांनाच आपला मार्ग मोकळा करावा लागला. मात्र पावसाळ्यापूर्वी ही धोकादायक झाडे हटविण्याची मागणी करूनही बांधकाम अधिकारी  उदासीन राहिल्याने त्याचा फटका आता नागरिकांना बसत असून तीव्र नाराजी आहे. झाड तोडून बाजूला करेपर्यंत बराच कालावधी या मार्गावरील वाहतूक ठप्प राहिली.

   या आपत्ती बरोबर मात्र बऱ्याच प्रतीक्षेनंतर पावसाने दमदार सलामी दिल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले असून बळीराजा सुखावला गेला आहे. पावसाने जोर पकडल्याने आता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने मात्र सज्ज होणे आवश्यक आहे.