
सावंतवाडी : बांधकाम व्यवसाय करणारे परप्रांतीय ठेकेदार तसेच मजूर कामगार टेम्पो व्यवसायात उतरल्यामुळे १८० हून अधिक स्थानिक टेम्पो व्यावसायिकावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत वेळोवेळी लोकप्रतिनचे लक्ष वेधून सुद्धा कोणीच लक्ष देत नसल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू असा इशारा सावंतवाडी टेम्पो चालक-मालक संघटनेच्या बैठकीत देण्यात आला.
चार ते पाच महिन्यांपूर्वी सर्व पक्षांचे लक्ष वेधून सुद्धा या प्रश्नासंदर्भात कोणीच लक्ष न दिल्यामुळे सर्व पक्षांच्या विरोधात यावेळी जोरदार नाराजी व्यक्त करण्यात आली तसेच परप्रांतीय टेम्पो चालकांकडून सुरू असलेल्या दादागिरी रोखण्यासाठी आता आक्रमक भूमिका घेण्यात येणार आहे असा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक व परप्रांतीय टेम्पो चालक यांच्यातील वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. आज याबाबत भूमिका ठरवण्यासाठी टेम्पो चालक-मालक संघटनेची बैठक येथील रिक्षा स्टॅन्ड वर घेण्यात आली. यावेळी झालेल्या बैठकीत बाहेरून या ठिकाणी ठेकेदार म्हणून आलेल्या तसेच कामासाठी आलेल्या परप्रांतीयांकडून टेम्पो घेऊन व्यवसाय केला जात असल्यामुळे सावंतवाडी शहरात असलेल्या १८० हून अधिक टेम्पो चालक मालकावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शहरात असलेल्या सहा स्टॅन्ड वरील चालक मालकाने आज आक्रमक भूमिका मांडली. जोपर्यंत आम्हाला योग्य तो न्याय दिला जात नाही, आमच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाही, तोपर्यंत आम्ही निवडणूक सहभागी होणार नाही. या मागण्या निवडणुकीपूर्वी पूर्ण न झाल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू, असा इशारा यावेळी उपस्थित टेम्पो चालक-मालकांकडून देण्यात आला आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर संघटनेच्या अध्यक्षपदी सतीश नार्वेकर यांची तर उपाध्यक्षपदी जमीर शेख खजिनदार विशाल सावंत सचिव हेमचंद्र सावंत आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.यावेळी आनंद वेरेकर, संदीप हळदणकर, निखिल सुभेदार, नितेश पेडणेकर, विनोद राऊळ, थॉमस पिंटो, विद्यानंद चिपकर, राजन ठाकूर, उत्तम सावंत, गणेश वेंगुर्लेकर, अभिजीत भोगण, सुशील बावकर, महेश सावंत, चंद्रकांत म्हाडगुत, कृष्णा राऊळ, लक्ष्मण नाईक, संतोष पाटील, शशिकांत धुरी, दत्ताराम पिंगुळकर, प्रदीप हळदणकर, महेश गावडे, रामदास कासार, प्रवीण सावंत, राहुल वरख, प्रकाश राऊळ, केदु शेळके, राॅबर फर्नांडिस, तनबीर बेग, एकनाथ मयेकर, विठ्ठल गुरव, सुनील प्रभूकेळुसकर, समीर बेग, उमेश दाफले, रवींद्र राऊळ, केशव जाधव, राजन गोवेकर, अवधूत परब आदी उपस्थित होते.