PM मोदींच्या नावावर केला जाणारा भ्रष्टाचार पचवू दिला जाणार नाही

विनायक राऊतांचा इशारा
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: November 20, 2023 20:40 PM
views 176  views

मालवण : किल्ले सिंधुदुर्ग येथील समुद्रात होणाऱ्या नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरातील विकासकामांसाठी निधीची खिरापत वाटली जात आहे. हा निधी लाटण्यासाठी काही ठेकेदार टपून बसले आहेत. त्यांना शासनकर्त्यांचाही आशीर्वाद आहे. मालवण शहरात होणाऱ्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर केला जाणार भ्रष्टाचार पचवू दिला जाणार नाही. भ्रष्टाचार केलेल्या विकासकामांची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार केली जाणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी मालवण येथे आयोजीत पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, जान्हवी सावंत, मंदार केणी, महेश जावकर, यतीन खोत, दिपा शिंदे, हेमंत मोंडकर, रश्मी परूळेकर, भाई कासवकर, करण खडपे, निनाक्षी मेथर, बाबी जोगी, सन्मेष परब, यशवंत गावकर, गणेश कुडाळकर, भगवान लुडबे, बंड्या सरमळकर, मनोज मोंडकर, संतोष अमरे, सुरेश मडये आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना खासदार राऊत म्हणाले, नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण १८ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी व १३ ऑक्टोबर रोजी नौदलाचे वेस्टन नेव्हल यांना पत्र लिहिले होते. या पत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर असलेल्या किल्ले सिंधुदुर्गची ढासळलेली तटबंदी मजबूत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, दर्शनासाठी येणाऱ्या शिवभक्तांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सुवर्णमंडीत करावी अशी मागणी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 'पद्मगड' किंवा 'धोनतारा' येथे उभारण्यात यावा अशी मागणी केली होती. छत्रपती शिवरायांचा पुतळा आता राजकोट येथे उभारण्यात येत आहे. त्याबद्दल आपण समाधानी आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दित पहिले आरमार स्थापित झाले त्या आरमाराचे प्रमुख मायनाक भंडारी यांचे स्मारक सिंधुदुर्ग किल्याच्या समोरील शासकीय जागेत व्हावे. त्याचप्रमाणे किल्ले सिंधुदुर्गचे भूमीपूजन ज्या ठिकाणी झाले तो ऐतिहासिक मोरया धोंडा, रेकोबा घाटी येथील ढोपर कोपर या ऐतिहासिक स्थानांचे पर्यटन स्मारकात रूपांतर व्हावे जेणेकरून दैदिप्यमान इतिहास पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने सिंधुदुर्गात येतील अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केल्याचे ते म्हणाले.

नौसेना दिनाचा कार्यक्रम सिंधुदुर्ग किल्ला येथील समुद्रात होत आहे ही सिंधुदुर्गवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. मात्र नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात जी विकासकामे होत आहेत. त्या विकासकामांमध्ये भ्रष्टाचार होत आहे. ज्या रस्त्यांच्या कामांचे डांबरीकरण होत आहे ते रस्ते उखडले गेले आहेत. मालवण ग्रामीण रूग्णालयाच्या इमारतीला रंग मारण्यात आला आहे. तो रंग म्हणजे खऱ्या अर्थाने चुना लावण्याचे काम केले गेले आहे. त्यामुळे या सर्व भ्रष्टाचारांच्या कामांची पंतप्रधान नरेंद्र मोदी दखल घेऊन त्याबाबत राज्य शासनाला आदेश देतील अशी आपल्याला अपेक्षा असल्याचे राऊत म्हणाले.

किनारपट्टीवरील पारंपारिक मच्छीमार प्रतिकुल परिस्थितात जीवन जगून मासेमारी करत आहेत. परंतु राज्यातील सरकार यांत्रिकी मासेमारी, एलईडी, पर्ससीन मासेमारी करणाऱ्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे पारंपारिक मच्छीमारांची एक प्रकारे अवहेलना होत आहे. अनधिकृतरित्या एलईडी, पर्ससीन करणाऱ्या बोटी पकडून किंवा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई बरोबरच फौदाजरी गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. नौसेना दिनाच्या कालावधीत किनारपट्टीवरी मासेमारी काही दिवसांसाठी बंद असणार आहे. त्यामुळे मच्छीमारांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे केरळ, तामिळनाडूच्या धर्तीवर नोंदणीकृती बोटमालकांना रोख स्वरूपात नुकसान भरपाई देण्यात यावी अशी आपली मागणी केली आहे.


चिपी विमानतळाचे महत्व कमी होणार नाही !

तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हट्टामुळे चिपी विमानतळ हे खाजगी ऑपरेटरकडे देण्यात आले. संबंधित खाजगी ऑपरेटरला विमानसेवा चालविण्याचा कोणताही अनुभव नसताना चिपी विमानतळाचे कामकाज त्याच्याकडे देण्यात आले. हवाई उड्डाण मंत्री ज्योतीरादित्य सिदिंया, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुभाष देसाई व आपण संबधित ऑपरेटरबाबत कठोर भूमिका घेतली होती. तसेच दिपक केसरकर व आपल्या निधीतून विमानतळाची विकासकामेही पूर्ण करण्यात आली होती. वैमानिकाला विमान लॅडीग करताना लँडीग पॉईट दिसण्यासाठीची व्हीझीबीलॅटी दर्जेदार असणे आवश्यक आहे. परंतु ठेकेदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे चार विमानांचे लॅडिंग कॅन्सल करावे लागले आहे. बिनडोक डोक्याच्या त्या ऑपरेटमुळे चिपी विमानतळ बंद होण्याच्या मार्गावर आहे. विमानतळाचे एमआयडीसी किंवा हवाई उड्डाण मंत्रालयाकडे दिल्यास चिपी विमानतळाची परिस्थिती सुधारू शकते. त्यामुळे मोपाचे विमानतळ सुरू झाले तरीही चिपी विमानतळाचे महत्व कती होणार नाही असे ते म्हणाले.