...तर कुटुंबियांसमवेत आत्मदहन करणार !

पर्यटन व्यावसायिक तोडणकरांचा इशारा
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 27, 2023 18:05 PM
views 44  views

मालवण : बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी माझे बांधकाम हटविताना इतरही शासकीय जागेतील अनधिकृत बांधकामे हटविणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र अद्यापपर्यंत याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने समुद्राखालील उपोषणाचा निर्णयावर मी ठाम आहे. याबाबत पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, बंदर विभाग यांच्याकडे पत्रव्यवहार करून येत्या पंधरा दिवसात इतर अनधिकृत बांधकामे हटविण्याची ठोस कार्यवाही न झाल्यास बंदर विभागाच्या कार्यालयासमोर कुटुंबियांसमवेत आत्मदहन करणार असल्याचा इशारा पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

दामोदर तोडणकर यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.  यावेळी पत्नी दिव्या तोडणकर, ओम तोडणकर उपस्थित होते. बंदर विभागाने सुडभावनेतून माझे राहते घर तोडले आहे. यामुळे आपण न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून न्यायालयीन लढाई सुरूच ठेवणार आहे. न्यायप्रविष्ठ बाब असताना जेसीबीच्या सहाय्याने माझे बांधकाम तोडण्यासाठी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्यावरही कारवाई करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार आहे. तसेच बंदर विभागातील एका अधिकाऱ्याच्या कुटुंबियांनी केलेले अनधिकृत बांधकाम अद्याप पाडण्यात आले नाही. आपल्या कुटुंबियांना वाचवून इतरांचे बांधकाम तोडण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या त्या अधिकाऱ्याला नोकरीत राहण्याचा हक्क नाही. यामुळे याबाबतही आपण शासनाचे लक्ष वेधणार असल्याचे तोडणकर यांनी सांगितले.

शासकीय जागेमध्ये उभारलेल्या ६१ बांधकामांची यादी शासनाने तयार केली आहे. यामुळे या बांधकामांवर कारवाई करण्याची धमक प्रशासनाने दाखवायला हवी. माझे बांधकाम तोडण्यासाठी ज्या पद्धतीने तातडीने कार्यवाही करण्यात आली होती. त्याप्रमाणे इतरांचेही बांधकाम तोडण्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करावी. अन्यथा आपण उपोषण छेडणार. मी मच्छीमार आणि गाबित कुटुंबातील असतानाही माझे बांधकाम तोडताना माझ्या पाठिशी कोणीही उभे राहिले नाही. मला एकटा पाडण्यात आले. यामुळे आता मी माझी लढाई लढणार आहे. माझ्यावर झालेल्या कारवाईप्रमाणेच इतरांचीही बांधकामे हटवायलाच हवी. तरच शासन यंत्रणा पारदर्शकपणे काम करत असल्याचे दिसून येईल. अन्यथा फक्त माझ्यासाठी ही कारवाई होती काय? असा प्रश्न आहे.