
सिंधुदुर्गनगरी : तहसीलदार कार्यालय सावंतवाडी येथील महसूल सहाय्यक सचिन हराळे यांना दोन आरटीआय कार्यकर्ते यांच्याकडून दिनांक 23 जुलै 2024 रोजी झालेल्या मारहाणीचा संघटनेच्या वतीने तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदवण्यात आला. महसूल विभागामध्ये सद्यस्थितीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात 40% पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत अशावेळी अतिरिक्त कार्यभार आणि त्यामुळे ताणतणाव यामुळे कर्मचारी अगोदरच दबावाखाली वावरत असताना कर्मचाऱ्यांवर प्राणघातक गंभीर दुखापत करण्याच्या हेतूने हल्ला केलेले हल्लेखोर यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने निषेध आणि कारवाईसाठी निवेदन माननीय जिल्हाधिकारी किशोर तावडे आणि पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना देण्यात आले.
संबंधिताविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई नाही झाली तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महसूल सहाय्यक तलाठी मंडळ अधिकारी , अव्वल कारकून कोतवाल आणि शिपाई या सर्वांनी आंदोलनाचा इशारा देण्यात आला. या पुढे अशा प्रकारची घटना कुठेही होऊ नये यासाठी व सदरील घटनेचा निषेध करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदय किशोर तावडे साहेब यांना निवेदन देण्यात आले. संबंधित इस्माविरोधात कारवाई झाली नाही तर आगामी काळामध्ये तीव्र स्वरूपाची आंदोलने यामध्ये लेखणी बंद, काम बंद, धरणे , बेमुदत रजा आंदोलन अशा प्रकारच्या आंदोलन करण्याबाबत भूमिका घेतली जाईल. यामध्ये जिल्ह्यामधील सर्वच तलाठी, मंडळ अधिकारी ,महसूल सहाय्यक , सहाय्यक महसुल अधिकारी शिपाई, वाहन चालक, कोतवाल यांचा देखील समावेश असेल अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आले.
तसेच सद्यस्थितीमध्ये शासनामार्फत वेगवेगळ्या योजना लागू करण्यात येत असून त्यामुळे देखील कामाचा प्रचंड ताण वाढलेला आहे अशावेळी नागरिकांना सहकार्यासाठी याद्वारे आवाहन करण्यात येत आहे. सदर निवेदन देताना जिल्ह्यामधील सर्वच तालुक्यामधील महसूल कर्मचारी आणि तलाठी संघटनेचे जिल्हास्तरीय नेते श्री दिलीप पाटील, श्री गवस, यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना, सिंधुदूर्ग अध्यक्ष श्री.सत्यवान माळवे , संभाजी खाडे कार्याध्यक्ष, शिवराज चव्हाण सरचिटणीस, विलास चव्हाण उपाध्यक्ष, संतोष खरात मार्गदर्शक, तलाठी संघटनेचे नेते श्री.दिलीप पाटील, श्री. एम.जी.गवस, श्री. एकनाथ गंगावणे स्वप्निल प्रभू प्रसिद्धी प्रमुख, अशोक पोळ, रमेश कांबळे, DCPS जिल्हाध्यक्ष, यांच्यासह विविध संघटना पदाधिकारी उपस्थित होते.