
बांदा : सोमवारी बांदा शहराच्या आठवडा बाजारादिवशी परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून सायंकाळच्या वेळी कचरा तेथेच टाकण्यात येत असल्याने आळवाडी मैदानाला बकाल स्वरूप प्राप्त होते. स्थानिक प्रशासनाला कचरा उचलताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने आज भल्या पहाटेच सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी आठवडा बाजारात जाऊन व्यापाऱ्यांना सूचना दिल्यात. तसेच सूचनांचे पालन न करणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा यावेळी प्रशासनाच्या वतीने देण्यात आला.
बांदा शहरात कचऱ्याची समस्या जटील आहे. शहराचा आठवडा बाजार सोमवारी आळवाडी मैदानात भरविण्यात येतो. याठिकाणी मोठ्या प्रमाणात परप्रांतीय विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. सायंकाळी बाजार आटोपल्यानंतर याठिकाणीच उरलेली भाजी व कचरा हा अस्तव्यस्त टाकण्यात येतो. यामुळे दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायत सफाई कामगारांना कचरा उचलण्यास त्रास सहन करावा लागतो. याबाबतच्या तक्रारी ग्रामपंचायत प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या.
यासाठी आज सकाळीच सरपंच श्रीमती नाईक, उपसरपंच श्री खतीब, ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत, प्रशांत बांदेकर, बाळू सावंत, आबा धारगळकर, रत्नाकर आगलावे, रुपाली शिरसाट, रिया येडवे, तनुजा वराडकर, रेश्मा सावंत, श्रेया केसरकर यांनी आठवडा बाजारात येत व्यापाऱ्यांना सक्त सूचना दिल्यात. तसेच मैदानावर मालवाहक गाड्या पार्क करण्यात येत असल्याने ग्राहकांना खरेदीसाठी अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी सर्व गाड्या मैदानाच्या बाहेर पार्क करण्यात आल्या. यामुळे ग्राहकांना विना अडथळा खरेदी करणे शक्य झाले.
विक्रेत्यांनी स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन न केल्यास दांडात्मक कारवाई करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.