
कुडाळ : गोवा-महामार्गावर पिंगुळी मोडकावड या ठिकाणी आज सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास एका व्हॅगनार कारचा भीषण अपघात झाला. महामार्गावर असणाऱ्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी, कारचे मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गोवा महामार्गावरील पिंगुळी मोडकावड परिसरात सकाळी व्हॅगनार कारचा अपघात झाला. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये कारचे चाक गेल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार जागेवरच पलटी झाली. हा अपघात इतका गंभीर होता की, कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
महामार्गावरील खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असल्याने प्रवाशांकडून आणि नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. वेळीच या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.












