प. पू. भालचंद्र महाराज यांच्या १२० व्या जन्मोत्सवास भक्तीमय वातावरणात प्रारंभ

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 29, 2024 10:52 AM
views 214  views

कणकवली :प. पू. भालचंद्र महाराज यांच्या १२० व्या जन्मोत्सवास रविवारी भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला. यानिमित्त १ फेब्रवारीपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार असून महोत्सवाच्या पहिल्या दिवशी भालचंद्र महाराज यांच्या दर्शनासाठी रिघ लागली होती.

प. पू. भालचंद्र महाराज यांच्या १२० व्या जन्मोत्सवानिमित्त संस्थानात २८ जानेवारी ते १ फेब्रुवारीदरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत. रविवारी पहाटे काकड आरती, समाधीपूजा, अभिषेक हे धार्मिक कार्यक्रम झाले. त्यानंतर श्री सत्यनारायणाची महापूजा झाली.  तदपूर्वी सकाळाच्या सत्रात सर्व भक्तांच्या कल्याणार्थ ब्रह्मवृंदांच्या मंत्रोपचारात परमहंस भालचंद्र महारुद्र स्वाहाकार पूजेचा मान ओम आळवे व सौ.आळवे  या दाम्पत्याला मिळाला.

यावेळी संस्थांचे अध्यक्ष तसेच विश्वस्त मंडळ व भाविक भक्तगण उपस्थित होते. दुपारी सत्रात भालचंद्र महाराज यांची महाआरती झाली. त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भजनी कलाकारांनी भजने सादर करून वातावरण भक्तीमय केले. सायंकाळच्या सत्रात जि. प. शाळा नंबर ३ च्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शनपर कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आदर्श संगीत विद्यालय कणकवलीच्या विद्यार्थ्यांनी शास्त्रीय तबला वादन केले. हे कार्यक्रम पाहण्यासाठी नागरिक उपस्थित होते. सायंकाळच्या सत्रात भालचंद्र महाराज यांची नित्य आरती करण्यात आली. भालचंद्र महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त संस्थान परिसरात आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी तसेच मंदिरात फुलांची आरास केली आहे. त्यामुळे भालचंद्र महाराज यांच्या मूर्तीचे रुप मनमोहन बनले आहे. ही आरास सर्वांचे लक्षवेधून घेत आहे.