वृंदा कांबळींची 'तटस्थतेच्या अवकाशातून' कादंबरी वाचकांच्या भेटीला

सामाजिक प्रश्नांना स्पर्श करणारी कादंबरी
Edited by: दिपेश परब
Published on: March 14, 2026 12:15 PM
views 36  views

वेंगुर्ले :  ज्येष्ठ साहित्यिक वृंदा कांबळी यांची ' तटस्थतेच्या अवकाशातून ' ही नविन कादंबरी प्रेक्षकांच्या भेटीला आली असून या कादंबरीचे प्रकाशन आज येथील साई मंगल कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

    खर्डेकर महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य आनंद बांदेकर, किरात ट्रस्टच्या सीमा मराठे, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे सचिन परुळकर, प्रदीप कुबल, श्री गावडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिपेश परब, जिल्हा कार्यकारणी सदस्य महेंद्र मातोंडकर आदी मान्यवरांच्या हस्ते या कादंबरीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना वृंदा कांबळी म्हणाल्या, कोल्हापूर येथील रावा प्रकाशनने हे पुस्तक काढले आहै. मुखपृष्ठ ऋतुराज कुलकर्णी यांचे आहे. प्रकाशनाचा कार्यक्रम न करता आपण अशाप्रकारे पत्रकार परिषदेत पुस्तकाविषयी सांगत आहे. याचे कारण की मोठा कार्यक्रम करत असताना अन्य औपचारिकतेतच आपण अडकून राहातो. पुस्तकात काय सांगायचे आहे हा विषय काहीसा बाजुलाच राहातो. 

     कादंबरी लेखन हे अन्य साहित्य प्रकारापेक्षा अधिक जटील व अधिक आव्हानात्मक असते. तो विषय लिहिताना लेखिका म्हणून त्यांनी आपली भूमिका व्यक्त केली, वृंदा कांबळी पुढे म्हणाल्या ही कादंबरी वर्तमानकाळ आणि भूतकाळ अशा दोन पातळ्यांवर घडत आहे. नायकाच्या जीवनातील घटना फ्लॅश बॅकने दाखवल्या आहेत. या कादंबरीत नायकाच्या कुटूंबातील  व सभोवतालची अनेक व्यक्तिरेखा आल्या आहेत. त्या एकमेकांत गुंतलेल्या आहेत. या व्यक्तिरेखांच्या सुख दुःखाच्या उभ्या आडव्या धाग्याची कादंबरी बनली आहे.  कथानकातील घटना कोकणातील एक खेडे, मुंबई  रत्नागिरी व वर्तमानात पुणे शहरात घडत आहेत. 

    या कादंबरीचा नायक असाध्य अशा आजाराने आजारी आहे. आपण आता थोड्याच दिवसांचे सोबती आहोत हे त्याला माहिती आहे. त्याने ते स्विकारलेली आहे. अशा मानसिक अवस्थेत भय, हुरहुर, आसक्ती व विरक्ती यांची  रस्सीखेच  अशा मानसिकतेतून जात असताना ,मनाच्या व शरीराच्या वेदना सहन करत असताना त्याची मानसिकता काय असेल? स्वतःच्या भूतकाळाचा व एकूण जीवनाचा विचार करत असताना तो आपल्याच जीवनाकडे तिर्‍हाईत दृष्टीने कसा पाहात असेल? आणि तो जणू स्वतःचेच अंतरंग खरवडून काढतो आहे. अशा वेळेस तो कोणता विचार करत असेल? स्वतःच्या चुकांचा कसा स्विकार करील? आपल्या कृतीचे कसे समर्थन करील? सार्या भावनिक गुंत्यातून तो स्वतःची सुटका कशी करून घेईल? एखाद्या नदीच्या काठावर उभे राहून नदीच्या प्रवाहाकडे पहावे त्याप्रमाणे स्वतःच्याच जीवन प्रवाहाच्या तटावर उभे राहून तो आपल्या जीवन प्रवाहाकडे तटस्थपणे कसा पाहील? तटस्थतेचे अवकाश वैचारिक दृष्ट्या कसे व्यापक बनत जाईल , तै बदलत असताना त्याची वैचारिक भूमिका कशी बदलत जाईल या आणि अशाच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रवास म्हणजेच ही कादंबरी आहे. 

    नायकाचा जीवनप्रवास सांगत असताना मी त्याच्या वर्तमानात एक छोट्याशा रूममधील काॅट व व्हिल चेअरवरून  खिडकीजवळ बसल्यावर खिडकीतून रस्त्यावरचे दिसणारे दृष्य एवढेच मर्यादित जग त्याचे आहे. अशावेळेस त्याचे सगळे अंतरंग घुसळून काढून अंतर्गत मनोव्यापार कादंबरीत चित्रित केले आहेत. 

     नायकाच्या जीवनप्रवास प्रसंगांचे वर्णन करत असतानाच मी जाणीवपूर्वक  कोकणातील निसर्ग, बागायती, शेती, कोळंब्याने आगराला पाणी लावण्याचे वर्णन कोकणातील अरुंद पायवाटा,घाट्या डोंगर झुडपे वगैरे निसर्ग आला आहे. साठ पासष्ट वर्षापूर्वीचे कोकणातील खेड्यातील चालीरीती, सण उत्सव, रूढी , एकूणच तेथील लोकजीवन आले आहे. रूढीप्रियतेत व्यक्तिगत आनंद आणि सामाजिक  संदर्भ यांच्यातील सीमारेषा न समजल्यामुळे कर्जाच्या  डोंगराखाली भरडले गेलेले नायकाचे कुटूंब  दाखवले आहे. संवादासाठी ग्रामीण बोलीभाषेचा वापर केला आहे. 

रात्रशाळेत मुलांच्या जीवनातील भयाण वास्तव चित्रित केले आहे. नायकाच्या जीवनातील प्रसंग सांगत असताना कोकणातील आंबा व्यापार, दूध व्यवसाय हे नायकाने पूर्वी केलेले व्यवसाय त्यातील बारकावे व चढ उतार आहेत. नायक एका संघटनेचा सच्चा व निष्ठावंत कार्यकर्ता होता. पण  ज्या तत्त्वांसाठी नायकाने आपली शक्ती खर्ची घातली होती ती तत्त्वे भोवताली रुजली नाहीत. मग निष्ठावंत कार्यकर्त्याच्या  प्रामाणिक भावनांचे मूल्य काय? त्याच्या मनाच्या वेदनेवर फुंकर कोण घालील? 

या कादंबरीतून  काही सामाजिक प्रश्न निर्माण होतात .रूढीप्रियतेमुळे कर्जबाजारी होऊन वर्षानुवर्षे कर्जाचे डोंगराखाली चिरडून जाणार्या माणसांची मानसिकता कशी बदलणार? संपत्ती आणि सत्ता यांच्याच पुढे फक्त वाकणार्या मुर्दाड व्यवस्थेत गरिबांचा वाली कोण असेल? गरिबांच्या मुलांच्या गुणांची, कलांची होणारी मुस्कटदाबी कशी थांबेल? कोकणातील तरूण पोटासाठी व शिक्षणासाठी मुंबईची वाट धरतात.  घरे नंतर पडून जातात हे भीषण वास्तव कसे बदलेल? विषम समाज रचनेत भरडल्या जाणार्या गरीबाच्या मुलाच्या मनाच्या विदारक दुःखाचे वर्णन यात आले आहे. या आणि अशा अनेक प्रश्नाना कादंबरी स्पर्श करते आहे. नायकाच्या जीवन प्रवासाच्या प्रवाहात हे असे अनेक सामाजिक प्रश्न त्या अनुषंगाने  येत आहेत. साठ वर्षापूर्वीच्या ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब  आले आहे त्याचबरोबर वर्तमानातील नागरी जीवनाचे चित्रण आले आहे.दिरिद्र्य , गरीब श्रीमंत दरी, अंधश्रद्धा , रूढीप्रियता इत्यादीमुळे जीवनाला आलेल्या विरूपतेचे दर्शन आहे. 

सांगली येथील दिभो सन्स या कंपनीचे सीईओ दिलीप भोसले हे निर्माते व दिग्दर्शक आहेत.  यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. ते माझ्या ' मागे वळून पाहाता' या पुस्तकावर फिल्म काढू इच्छितात.कदाचित आवडली तर यावरही काढू शकतील. माझे हे चौदावे पुस्तक व सहावी कादंबरी आहे. अशी माहिती ज्येष्ठ साहित्यिक वृंदा कांबळी यानी दिली.