शाश्वत स्वच्छतेसाठी बचत गटांचा सहभाग महत्त्वाचा : सभापती गणेश राणे

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 14, 2026 13:41 PM
views 27  views

देवगड : शाश्वत स्वच्छतेसाठी बचत गटांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून गावपातळीवर स्वच्छतेचे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी बचत गटातील महिला प्रतिनिधींना अशा प्रकारचे प्रशिक्षण आवश्यक आहे, असे प्रतिपादन पंचायत समिती देवगडचे सभापती गणेश राणे यांनी केले.

राज्य पाणी व स्वच्छता मिशन तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून अॅग्रीकल्चर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेमार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)–२ अंतर्गत कचऱ्याचे विलगीकरण, सार्वजनिक स्वच्छता आणि स्वच्छतेबाबत वर्तनात बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने आयोजित दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती देवगडचे सभापती गणेश राणे व उपसभापती अमोल लोके यांच्या हस्ते झाले.

यावेळी पंचायत समिती देवगडचे सहाय्यक गटविकास अधिकारी विनायक पाटील, जिल्हा पाणी व स्वच्छता कक्षाचे रूपाजी किनळेकर, तालुका अभियान व्यवस्थापक हेमंत हळदणकर, तालुका व्यवस्थापक समीर वळंजू, तालुका व्यवस्थापक सुशांत कदम, तालुका व्यवस्थापक संजय पवार, प्रभाग समन्वयक अभिजित चव्हाण (शिरगाव, पोभुर्ले), प्रभाग समन्वयक भारती असरोंडकर, प्रभाग समन्वयक संगीता बांदेकर, प्रभाग समन्वयक प्रणव भटसाळसकर तसेच मास्टर ट्रेनर जयराम जाधव, सहदेव पाटकर, फिजा मकानदार, वसंत कदम, नचिकेत पवार , प्रशिक्षण समन्वयक श्रध्दा खाडे , गटसमन्वयक वैशाली मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रशिक्षणात देवगड तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमधील तीन बचत गट प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. प्रशिक्षणासाठी एकूण तीन बॅच तयार करण्यात आल्या होत्या.या प्रशिक्षणासाठी गटविकास अधिकारी  देवगड अरुण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी ( ग्रा.प ) दिपक तेंडुलकर , व विस्तार अधिकारी( ग्रा.प ) तुषार हळदणकर यांची नियुक्ती करण्यात आली होती .

या  प्रशिक्षणाला शुभेच्छापर मार्गदर्शन करताना उपसभापती देवगड अमोल लोके म्हणाले की, पाणी, स्वच्छता आणि आरोग्य यांचा परस्परांशी घनिष्ठ संबंध असून त्यामध्ये योग्य समन्वय साधण्यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे ठरते.

या प्रशिक्षणामध्ये घरगुती कचरा विलगीकरण , वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर , शाश्वत दृष्यमान सार्वजनिक स्वच्छता संकल्पना व महत्व, शाश्वत स्वच्छतेसाठी महिलांची भुमिका व जबाबदारी , सार्वजनिक स्वच्छता आणि लोकसहभाग आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक धुरी यांनी केले तर आभार गटसमन्वयक वैशाली मेस्त्री यांनी मानले .