
देवगड : गावांमध्ये स्वच्छतेत सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी तसेच प्लास्टिक पिशव्यांना पूर्णतः पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी कापडी पिशव्यांची निर्मिती आवश्यक आहे. बचत गटातील महिलांनी पुढाकार घेतल्यास या माध्यमातून रोजगार निर्मितीही होऊ शकते. या उपक्रमासाठी आपली टीम सर्वतोपरी मदत करेल, असे आवाहन पंचायत समिती देवगडचे सभापती गणेश राणे यांनी केले.
राज्य पाणी व स्वच्छता मिशन तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून अॅग्रीकल्चर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेमार्फत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)–२ अंतर्गत दोन दिवसीय अनिवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. कचऱ्याचे विलगीकरण, सार्वजनिक स्वच्छता आणि स्वच्छतेबाबत वर्तनात बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने आयोजित या प्रशिक्षणाचा प्रमाणपत्र वितरण समारंभ पंचायत समिती देवगड सभापती गणेश राणे व कक्ष अधिकारी संतोष बिर्जे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी प्रभाग समन्वयक भारती असरोंडकर, संगीता बांदेकर, प्रणव भटसाळसकर तसेच मास्टर ट्रेनर जयराम जाधव, सहदेव पाटकर, फिजा मकानदार, वसंत कदम, नचिकेत पवार आणि प्रशिक्षण समन्वयक श्रद्धा खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रशिक्षणात देवगड तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीतून तीन बचत गट प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला. प्रशिक्षणासाठी एकूण तीन बॅच तयार करण्यात आल्या होत्या. महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्रशिक्षणादरम्यान घरगुती कचरा विलगीकरण, वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर, शाश्वत सार्वजनिक स्वच्छतेची संकल्पना व महत्त्व, स्वच्छतेसाठी महिलांची भूमिका व जबाबदारी तसेच सार्वजनिक स्वच्छता आणि लोकसहभाग या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.











