वि.प. प्रभू पुरस्कृत ग्रंथपाल सदानंद रेडकर स्मृति पुरस्कार

Edited by:
Published on: February 13, 2025 20:44 PM
views 115  views

सावंतवाडी : आरपीडी हायस्कूलमधील ५वी ते ७ वी वर्गासाठी दरवर्षी वि.प. प्रभू पुरस्कृत ग्रंथपाल सदानंद रेडकर स्मृति पुरस्कार देण्यात येणार असून यासाठी आरपीडी हायस्कूल व ज्युनि. कॉलेजच्या माजी मुख्याध्यापिका वि.प.प्रभू यांनी शिक्षण प्रसारक मंडळाकडे कायमस्वरुपी रु. २५ हजारची ठेव ठेवली आहे. या रक्कमेच्या व्याजातून दरवर्षी वक्तृत्व व लेखन स्पर्धा घेवून पहिल्या चार क्रमांकाना पारितोषिके देण्यात येणार आहेत अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांनी दिली आहे.

आपले विचार, भावना, कल्पना चांगल्याप्रकारे व प्रभावीपणे बोलून व्यक्त करता येते तसेच ते सुवाच्च, मुद्देसूद कलात्मक आणि आस्वादक रितीने विविध लेखन प्रकारात प्रकट करता येणे हा माणसाच्या व्यक्तिमत्वाचा महत्त्वाचा पैलू आहे. त्याचे जतन -संवर्धन लहानपणापासून व्हावे लागते. यासाठी आरपीडी हायस्कूलच्या ५ वी ते ७ वी तील विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. दिवंगत सदानंद ह. रेडकर यांना विद्यालय व ग्रंथालय या विषयी फार प्रेम होते. ग्रंथपाल म्हणून त्यांचे काम चांगले काम होते. विविध वक्तृत्व व लेखन स्पर्धांत भाग घेण्यासाठी त्यांचे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन असायचे. म्हणून रेडकर यांच्या स्मरणार्थ निबंध व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात याव्यात अशी इच्छा श्रीमती वि.प. प्रभू यांनी व्यक्त केला आहे. वि.प.प्रभू राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज येथे सुरुवातीची शिक्षिका व नंतर मुख्याध्यापिका या पदावर कार्यरत असताना संस्कृत, हिंदी, मराठी व इंग्रजी हे विषय त्यांचे अध्यापनाचे होते.

सेवानिवृत्तीनंतर त्यांची मालवणी बोली भाषेतील म्हणी, अबोली,  कोकणातील लोककथा आणि गजाली, शब्दसौरभ, मालवणी बोलीभाषेतील वाक्प्रचार व हुमाणी, ओवळी ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.कोकण मराठी साहित्य परिषद, सिंधुदुर्ग प्रतिष्ठान, तसेच मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे यांच्याकडून त्यांच्या काही पुस्तकांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत. विद्या प्रभू या सद्या बदलापूर, ठाणे येथे रहात असल्या तरी त्यांच्या आयुष्याची जडण घडण या राणी पार्वती देवी हायस्कूल या विद्यालयात झाली आहे. आजही त्या शाळेकडे लक्ष ठेवून आहेत. यापूर्वी त्यांनी रु.९०,०००/- च्या ठेवी बक्षिसासाठी ठेवल्या आहेत. या ठेवीच्या व्याजातून १२ वी कला शाखेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांला 'कला पुरस्कार' १२ वी वाणिज्य शाखेतून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस 'वाणिज्य पुरस्कार', १२ वी विज्ञान शाखेतून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांस 'विज्ञान पुरस्कार' दिले जातात. तसेच एस.एस.सी. ला गणित व विज्ञान विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांला 'गणित विज्ञ पुरस्कार', एस.एस.सी. परीक्षेत हिंदी संस्कृत विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांस 'वागीश्वरी पुरस्कार' आणि एस.एस.सी. परीक्षेत मराठी विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांला 'माय मराठी भूषण' पुरस्कार दिले जातात. वि.प्र. प्रभू यांनी आतापर्यंत शिक्षण प्रसारक मंडळाकडे एकूण रु.१,१५,०००/- च्या ठेवी बक्षिसासाठी ठेवल्या आहेत अशी माहिती डॉ. नागवेकर यांनी दिली.