
दोडामार्ग : भारताचे उज्वल भविष्य हे तरुणांच्या हाती आहे. भारताची लोकशाही ही मजबूत आणि सक्षम करायची असेल, तर तरुणांनी वंश, धर्म, जाती, पंथ तसेच कोणत्याही आर्थिक प्रलोभनाला बळी न पडता, नि:ष्पक्षपणे मतदान केले पाहिजे. असे मत प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी व्यक्त केले. आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती उपक्रमांतर्गत "मतदान जनजागृती व्याख्यान" आयोजित केले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस नसून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याचा दिवस आहे. त्यामुळे सर्वांनी न चुकता मतदान केले पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केले आहेत, अशा विद्यार्थ्यांना मतदार नावनोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना निरपेक्षपणे मतदान करण्यासाठी शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे विस्तार कार्यशिक्षक डॉ. सोपान जाधव यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. संजय खडपकर यांनी केले.