उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक यांचं नवं मिशन

दरवर्षी दोन गुणवंत विद्यार्थ्यांना घेणार दत्तक
Edited by: संदीप देसाई
Published on: June 07, 2023 22:14 PM
views 193  views

दोडामार्ग : अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर सोनेरी यश मिळवूनही शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या मुलांसाठी दोडामार्ग तालुक्यातील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक यांनी एक 'नवं मिशन' सुरू केल आहे. गुणवत्ता आहे पण केवळ आर्थिक परिस्थिती नाही म्हणून स्वप्न असूनही उच्च शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या तालुक्यातील दोन विद्यार्थ्याना प्रशासकीय सेवेत आयएएस, आयपीएस अधिकारी बनविण्याचा निर्धार विवेकानंद नाईक यांनी केलाय. दरवर्षी अशा २ मुलांचा संपूर्ण खर्च उचलण्याचा जबाबदारी त्यांनी घेतली असून तालुक्यातील एक मुलगा आणि एक मुलगी अशा दोन परिस्थितीने गरीब पण बुद्धिमत्तेत अव्वल असणाऱ्या विद्यार्थांना दत्तक घेण्याचे त्यांनी बुधवारी जाहीर केले. नाईक यांच्या या पुढाकाराने ग्रामीण भागातील सोनेरी बुध्दीमत्तेला खऱ्या अर्थाने झळाळी मिळणार असून त्यांचं हे गुणवंत मुल दत्तक घेण्याच 'नवं मिशन' केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्हे तर अखंड महाराष्ट्रात सुद्धा नोंद घेण्यासारख आहे.

  बारावीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवून दोडामार्ग तालुक्यातून प्रथम आलेल्या कृष्णकांत गवस याला आयपीएस बनायचे आहे. मात्र, आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तो आपले स्वप्न पूर्ण करून शकत नसल्याची बातमी नाईक यांचे पर्यंत पोहचली. आणि तोच धागा पकडून नेहमीच सामाजिक, शैक्षणीक कार्यात समाजासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या विवेकानंद नाईक यांनी कृष्णकांत गवस याला शिक्षणासाठी दत्तक घेतल आहे. त्याच्या या आयपीएस पर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे उद्योजक विवेकानंद नाईक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केलं. इतकचं नव्हे तर ते आता दरवर्षी दोडामार्ग तालुक्यातून अश्या दोन विद्यार्थ्याची जबाबदारी उचलणार आहेत. याद्वारे तालुक्यातून आयएएस आणि आयपीएस अधिकारी घडविण्याचा आणि त्यांचेकडून देशसेवा करून घेण्याचा प्रेरणादायी संकल्प श्री. नाईक यांनी हाती घेतला आहे. 

         आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजाचे काहीतरी देणं लागतो, या निःस्वार्थी भावनेने विवेकानंद नाईक गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्याच पार्श्भूमीवर विवेकानंद नाईक यांनी आज आपल्या निवास्थानी वर्षा बंगल्यावर पत्रकार परिषद घेऊन आपल्या अशा नवं मिशन तथा संकल्पनेमागचा उद्देश अधोरेखित केला. ते म्हणाले दोडामार्ग तालुक्यातील मुलांमध्ये अफाट बुद्धिमत्ता आहे. याची प्रचिती मला कृष्णकांत गवस याच्याशी संवाद साधताना आली. बारावीच्या परीक्षेत त्याने उज्वल यश संपादन करूनही त्याला आपल स्वप्न पूर्ण करता येत नव्हतं ही बातमी आपल्याकडे प्रसार माध्यमातून आली. त्यानंतर आपण त्याला व त्याच्या आईला घरी बोलावून त्यांच्या परिस्थितीचा आढावा घेतला. कोरोना काळात त्याचे वडिलांना देवाज्ञा झाली. त्यानंतर घरची जबाबदारी त्याच्यावर आली. आई आणि कृष्णकांत दोघेही आपला प्रपंच काटकसरीने चालवत आहेत. बालवयातच घरची जबाबदारी खांद्यावर पडली तरीही कृष्णकांत डगमगला नाही. घरातील प्रपंच सांभाळत त्याने उच्च शिक्षण घेण्याची जिद्द सोडली नाही. आपले शिक्षण घेत असताना घरातील व शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी तो काम देखील करायचा. त्याची ती जिद्द मेहनत वाखाण्याजोगी होती. त्याच्याशी बराच संवाद साधल्या नंतर त्याला काय बनायचे आहे. त्याची मनस्थिती काय आहे. तो दृढ निश्चयी आहे का ? याबाबत त्याचीही गप्पा करत काही प्रश्न विचारले असता त्यांची त्याने समाधान कारक उत्तरे दिलीत. त्याच्या बोलण्यातुन त्याचा प्रामाणिकपणा जाणवत होता. त्याचे आदरपूर्वक बोलणे, समजून उमजून उत्तरे देण्याची समय सूचकतेमुळे कुशाग्र बुद्धीमत्ता दिसून आली. आणि आपण त्याचवेळी कृष्णकांत याचं स्वप्न साकार करण्याचा नीच्छय केला. त्याच्या आईला सांगितले की, कृष्णकांतचे आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी पुढाकार घेतो आहे. आयपीएस पूर्ण करण्यापर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी माझी आहे, असे सांगून मी कृष्णकांतची पुढील शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. आणि याच घटनेने मला आपल्या दोडामार्ग तालुक्यासाठी असं मिशन राबविण्याची संकल्पना त्यांना सुचली आणि त्यांनी ती सत्यात उतरविण्याची सूरवात केली आहे.


दरवर्षी २ विदयार्थ्यांची घेणार जबाबदारी

     अफाट गुणवत्ता असलेला एक मुलगा व एक मुलगी अशा दोघांना आपण दर वर्षी दत्तक घेऊन त्यांच्या स्वप्नांना बळ द्यायचे आहे. यातूनच आपल्या दोडामार्ग तालुक्यातील पहिला आयपीएस, आयएएस अधिकारी बनविणार असल्याचा संकल्प विवेकानंद नाईक यांनी केला आहे. ज्यांच्याकडे बौद्धिक क्षमता अफाट आहे. परंतु, आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना इच्छे प्रमाणे शिक्षण घेत येत नाही, अश्या वर्षाला दोन विद्यार्थीची जबाबदारी ते घेणार आहेत. यासाठी तालुक्यातील विविध शाळांच्या शिक्षकांनी अशी कोणी हुशार मुलं असतील मात्र त्यांच्या गुणवत्तेआड परिस्थिती येत असेल तर आपल्याशी संपर्क साधण्याचा आवाहन केलं आहे. आपल्या या मिशन मधून देशसेवेसाठी झटणारे सच्चे अधिकारी घडवयाचे आहेत. आणि हे मिशन आपण पूर्ण करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितलयं. 


दोडामार्ग बनावा अधिकाऱ्यांचा तालुका

आपण ज्या विद्यार्थ्यांना अधिकारी बनविण्यासाठी हे सार करणार आहे, त्यांच्याकडून गुरूदक्षीणा म्हणून आणखी काही नको, तर मी ज्यांना मदत करून जे विद्यार्थी अधिकारी बनणार आहेत. त्यांनी आपल्या सारखेच अधिक दोन अधिकारी या तालुक्यातून भविष्यात पालकत्व घेऊन अधिकारी बनवायचे आहेत. ज्यामुळे आपला दोडामार्ग तालुका अधिकाऱ्यांचा तालुका असेल.


    दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा

     तालुक्यातून दहावी बारावी परीक्षेत तालुक्यात व शाळेतून प्रथम क्रमांक पटकाविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा सुद्धा लवकरच विवेकानंद नाईक यांच्या पुढाकाराने होणार आहे. दोडामार्ग तालुका वर्धापन दिनाचे औचित्य साधून २७ जून रोजी हा सोहळा आयोजन करण्याचे नियोजन आहे. दोडामार्ग तालुका पत्रकार समिती व विवेकानंद नाईक यांच्या ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा होणार असून याचवेळी तालुक्यातील पत्रकारांना जाहीर झालेल्या विवीध पुरस्कारांचे वितरण होणार आहे.