
सावंतवाडी : भाजपचे युवा नेतृत्व असलेले विशाल परब यांनी आज राजापूरमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले. काल मुंबई येथे त्यांचे निलंबन मागे घेतल्यानंतर मुंबई ते राजापूर असे जोरदार शक्तिप्रदर्शन करत ते रात्री राजापुरात दाखल झाले होते. त्यानंतर आज सकाळी दहा वाजता त्यांनी राजापूर येथे कार्यकर्त्यांसमोर एकत्र येत जोरदार शक्तिप्रदर्शन केलेले पाहायला मिळाले.
भाजपच्या जयघोषांनी हा परिसर दुमदुमून गेला होता. हे शक्तिप्रदर्शन करत विशाल परब हे सिंधुदुर्ग दिशेने रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात ते खारेपाटण येथे दाखल होणार असून खारेपाटण येथे त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. यानंतर कासार्डा येथे त्यांचे जंगी स्वागत होणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. तर दुपारी तीन वाजता झाराप झिरो पॉईंट येथे भाजप कार्यकर्त्यांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता झिरो पॉईंट येथून सावंतवाडीच्या दिशेने भव्य मोटर सायकल रॅली निघणार आहे.
ही रॅली सावंतवाडीतील भाजप कार्यालयापर्यंत येणार असून संध्याकाळी चार वाजता सावंतवाडीत भाजप कार्यालय येथे एका कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. विशाल परब हे जोरदार शक्ती प्रदर्शन करत सिंधुदुर्ग जिल्ह्यात हजारो गाड्यांचा ताफा घेऊन दाखल होत आहेत. यावेळी सगळीकडे भाजपचे झेंडे लावून वातावरण भगवेमय करण्यात आले आहे.