
सावंतवाडी : अपक्ष उमेदवार विशाल परब यांना पत्र पाठवित उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी पक्षशिस्ती विरोधी कार्यवाहीमुळे पक्षाच्या पदावरुन निलंबन करत त्यांचे भाजपा प्राथमिक सदस्यत्व रद्द केले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टी ही संघटना शिस्तबद्ध कार्यप्रणालीसाठी परिचित आहे. या संघटनेमध्ये पक्षाचा आदेश हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रत्येक कार्यकर्त्यासाठी बंधनकारक मानला जातो. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अशी जबाबदारी असताना आपण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला असून पक्षाच्या वरिष्ठांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना देवूनही आपण आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवलेला आहे. ही बाब पक्ष शिस्तीच्या विरोधी आहे. त्यामुळे प्रदेशाच्या सूचनेप्रमाणे जिल्हाध्यक्ष यांना या विषयात दिलेल्या अधिकारातून आपले पक्षाच्या पदावरुन निलंबन करण्यात येत आहे.
तसेच आपले भाजपा प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात येत असून यापुढे आपण आपल्या प्रचार किंवा अन्य बाबीसाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे पक्षाचे नाव, पद आणि पक्षाच्या नेत्यांची नावे किंवा फोटो वापरु नये असे बजावण्यात येत आहे. असे झाल्यास आपल्यावर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे पत्र भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी अपक्ष उमेदवार विशाल परब यांना पाठविले आहे.