विशाल परब यांचं 'मौन' ; विधानसभा निवडणूकीच्या वादळापूर्वीची शांतता ?

Edited by: संदीप देसाई
Published on: October 23, 2024 14:21 PM
views 848  views

ब्युरो न्यूज : विधानसभा निवडणुकीचे रणसंग्राम तापलेला असताना सर्वांचे लक्ष लागलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविणारचं असा निर्धार करून गेली दोन वर्षे सातत्याने थेट जनतेशी कनेक्टिव्हीटी वाढविणारे विशाल परब विधानसभा निवडणूका जाहीर झालेनंतर मात्र कमालीच्या नो कमेंट्स भूमिकेत राहिले आहेत. एका ठिकाणी आमदारकीसाठी राजन तेली यांनी भाजपाला दिलेली सोडचिट्टी तर दुसऱ्या ठिकाणी तेलींनी मशाल हाती घेतल्याने याच मतदार संघात महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असलेल्या अर्चना घारे परब यांच्या गोटातील वाढलेल्या राष्ट्रवादीच्या हालचाली. त्यात थेट शिवसेनेनेने मंत्री दीपक केसरकर यांना जाहीर केलेली उमेदवारी आणि या सर्व घडामोडीत प्रसंगी अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी सुरुवातीपासून सज्ज असलेले विशाल परब आता मात्र नेमके 'नो कमेंट्स' भूमिकेत असल्याने त्यांचं हे 'मौन' नेमकं कोणत वादळ उठविणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

  जिल्ह्यात कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या तीन विधानसभा मतदार संघापैकी सर्वात जास्त इच्छुक उमेदवार असलेला मतदार संघ म्हणजे सावंतवाडी होय. येथून सध्या मंत्री असलेले आणि गेल्या सलग ३ निवडणुकात विजयी झालेले आमदार दीपक केसरकर यावेळी विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज झालेले आहेत. त्यांना मंगळवारी रात्री शिवसनेने पहिल्या यादीतच उमेदवारी जाहीर केल्याने हा मतदार संघ महायुतीने शिवसेनेला सोडला हे आता स्पष्टच झाले आहे. नेमका हाच धोका ओळखून महायुतीत भाजप मध्ये असतानाही केसरकर यांना वारंवार कोंडीत पकडणारे माजी आमदार व मागील दोन वेळा केसरकर यांना विधानसभा निवडणूकमध्ये टक्कर देणारे राजन तेली यावेळीही ऐन निवडणूक तोंडावर आली असताना भाजपा सोडून उबाठा शिवसेनेत दाखल झालेत. येथे महाविकास आघाडीकडून हा मतदार संघ खरं तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी की उबाठा शिवसेना यांना सुटणार याबाबत राजन तेली यांनी पुढीलं गणित मांडत शिवसेना प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशान मात्र गेली ७ वर्षे मतदार संघात झटून काम करणाऱ्या अर्चना घारे परब यांच्या उमेदवारीचा सरळ असलेल्या मार्गात आडवाट निर्माण केली. ही आडवाट दूर करण्यासाठी महाविकास आघाडीत सिंधुदुर्ग राष्ट्रवादीने मोठी ताकद लावत शरद पवार यांचाही दरवाजा थोठावला. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. कारण बुधवारी आघाडीकडून हा मतदार संघ शिवसेनेला सोडत राजन तेली यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आलीय. त्यामुळे या निर्णयावर अर्चना घारे परब समाधानी होतील का? आघाडी त्यांची समजूत काढणार का? हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे इथे उमेदवारी जाहीर झालेंनंतर महाविकास आघाडीची बसलेली घडी पुन्हा बिघडली तर आच्छर्य वाटायला नको अशीचं स्थिती सध्यस्थितीत पाहावयास मिळते आहे. 

 त्यामुळे सावंतवाडी मतदार संघात आता महाविकास आघाडीचे दीपक केसरकर, महायुतीचे राजन तेली की वेगळी वाट निवडल्यास या दोघांविरोधात अर्चना घारे-परब असे तिघेही थेट एकमेकांना भीडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. हे तिन्ही उमेदवार पक्षांतर्गत उमेदवारीच्या ताकदीवर येत्या निवडणुकाना सामोरे जाण्यासाठी सज्ज झालेले होते. 

तर याच मतदार संघात आपल्या विशाल कर्तृत्व आणि दातृत्वाने सर्व सामान्याच्या मनातील हक्काचा उमेदवार म्हणून विशेषता युवा वर्गातून मागणी होत असलेला नवा चेहरा अर्थात विशाल परब यांनी हक्काचा माणूस असं निर्माण केलेलं निवडणूक लढविण्याचं वलय पुन्हा एकदा वादळासारखं घोंगवत ठेवलं तर या मतदार संघात चौकार मारू पाहणाऱ्या उमेदवरांना चौरंगी लढतीला सामोरे जावे लागणार आहे. म्हणूनच या मतदार संघात निवडणूक लढवीणारे उमेदवारचं नव्हे तर राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार या साऱ्यांत एक मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. अशातच निवडणूक जाहीर होताच २३ ऑक्टोबर ला उमेदवारी दाखल करणार असे स्पष्ट करणारे युवा नेतृत्व विशाल परब सध्या नो कमेंट्स च्या भूमिकेत असल्याने साऱ्यांच्या नजरा त्यांच्या भूमिकेकडे वळल्या आहेत. 

  एका ठिकाणी असलेले बुजुर्ग अनुभवी लीडर आणि दुसऱ्या ठिकाणी गेल्या काही वर्षात सावंतवाडी विधानसभा मतदार संघात स्वकर्तृत्वाने अनेकांगी लोकांभिमुख उपक्रमानी लोकशक्तीच्या विक्रमानी जनसामान्यासाठी झटणारे विशाल परब यांच्या भूमिकेबाबत या मतदार संघातील चाहते आस लावून वाट पाहत आहेत. ज्या पद्धतीने विशाल परब यांनी गेल्या काही वर्षात समाजाभिमुख कार्यक्रम आणि उपक्रम घेतलेत त्यासाठी असणारी उपस्थिती आणि गावागावातून मिळणारा प्रतिसाद निश्चितचं त्यांना या रणसंग्रमात उतरण्यासाठी भाग पाडू शकतो. खात्रीदायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असंच विशाल परब यांचं आताच मौन म्हणजे विधानसभा निवडणुका रणसंग्रमातील ही वादळापूर्वीची शांतता म्हणूनही त्याकडे पहिले जातेय.