
वेंगुर्ला : उभादांडा हायस्कुलच्या वाटे संदर्भातील प्रश्न येत्या पंधरा दिवसात मार्गी काढायची जबाबदारी आता माझी आहे. जिथे परमेश्वर आहे तिथे नक्कीच मार्ग आहे. यामुळे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे या ठिकाणी येतील आणि त्यांच्या माध्यमातून यासंदर्भात निश्चित मार्ग निघेल याची मी ग्वाही देतो. विद्यार्थ्यांचा मान जर कोणी हिसकावून घेत असेल तर विशाल परब गप्प राहणार नाही. एवढ्या वर्षाचा हा प्रलंबित प्रश्न 100% निकाली लावणार आणि त्यानंतरच याठिकाणी येऊन स्वागत स्वीकारणार असे वचन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी उभादांडा वासीयांना दिले.
येथील न्यू इंग्लिश स्कुल उभादांडा या माध्यमिक शाळेकडे जाणारा रस्ता एका कुटुंबाने पूर्णपणे बंद केल्याच्या निषेधार्थ १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या शाळेत जाताना मुलांना चिखलातून वाट काढीत झाडा झुडपातून जावे लागते. याबाबत विशाल परब यांची या शाळेच्या संस्था पदाधिकारी व पालक यांनी भेट देत आपली व्यथा मांडली होती. यावेळी आज विशाल परब यांनी उभादांडा हायस्कूलला भेट देत वस्तुस्थितीची पाहणी केली तसेच पालक व संस्था चालकांशी चर्चा केली यावेळी संस्था सचिव रमेश नरसुले व पालक म्हणून पत्रकार महेंद्र मातोंडकर यांनी याबाबत व्यथा मांडली. यावेळी सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करताना विशाल परब यांनी बुके घ्यायला नकार देत त्यावेळी हा प्रश्न मार्गी लागेल त्याच वेळी स्वागत स्वीकारेन असा शब्द दिला.
यावेळी ऍड निरवडेकर, माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र कामत-आडारकर, भाजप तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, युवामोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, माजी उपसरपंच राहुल गावडे यांच्यासाहित उभादांडा ग्रामस्थ, पालक, शिक्षक आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक वैभव खानोलकर यांनी केले.