
सावंतवाडी : राज्यातील शालेय शिक्षणात अध्ययन अध्यापनाचा दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अंमलबजावणी सुरू असून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदकडून विविध विषयाच्या कौशल्य प्राप्ती साठी कृती कार्यक्रम राबविले जात आहेत याचाच एक भाग म्हणून माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली व ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक साधन केंद्र,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक २२ एप्रिल रोजी व्हर्च्यूअल रिॲलिटी आभासी प्रयोगातून विज्ञान हे अध्ययन अध्यापन तंत्र विकसित करण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांसाठी एक दिवसीय विशेष कार्यशाळा आयोजित केली आहे याबरोबरच विद्यार्थ्यांना गोवा सायन्स सेंटरची सायन्स ऑन व्हील तसेच ६३ मुन्स टेक्नॉलॉजी, स्टेम लर्निंग मुंबई द्वारा संचलित सायन्स सेंटरचे ५० हून अधिक प्रयोगही हाताळता येणार आहेत.
प्रयोगशील विचार आणि स्वअनुभवातून शिकण्याची संधी मिळावी या उद्देशाने आयोजित कार्यशाळेत विज्ञानात रुची असलेले जिल्ह्यातील उपक्रमशील विज्ञान शिक्षक तसेच परिसरातील शाळांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
सकाळी ९ ते १२ या कालावधीत शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळा तर इयत्ता इयत्ता ७ वी ते ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी ११ ते संध्या.४ या वेळेत मनोरंजक अशा वैज्ञानिक संकल्पनांची विविध कृतीयुक्त सत्रे घेतली जाणार आहेत.
त्यात चमेलिऑन KMnO₄ चे आकर्षक रंग बदल, आम्ल-क्षार प्रमाणमापन, प्रयोगशाळेतील सुरक्षा व्यवस्थापन, निरीक्षण व नोंद कौशल्याचा विकास, खडक व खनिज ओळख, फील्ड वर्क अनुभव व कीओकस प्रकल्प, हवा व दाब यावरील मजेशीर प्रयोग, मोजमाप कौशल्य वाढवणारी बाह्य साहसी सत्रं, झाडांचे निरीक्षण, घरगुती वस्तू वापरून साधं कॅलिब्रेशन, इलेक्ट्रॉनिक आय सर्किट तयार करणे, वनस्पती निरीक्षण, संवाद आणि विज्ञानावर आधारित खेळ इत्यादींचा समावेश आहे.
शिक्षकांसाठी घेतल्या जाणाऱ्या प्रशिक्षणात व्हिआर सेटचा अध्यापनात वापर,ज्यामुळे अवकाशातीलभ्रमण, जैविक, रासायनिक प्रक्रिया प्रत्यक्ष पाहणे,ऐतिहासिक घटनांचा अनुभव (360° व्हिडिओ),मानवी शरीराची अंतर्गत रचना (सजीव 3D मॉडेल),विज्ञान प्रयोगशाळेचे सजीव प्रशिक्षण दिले जाणार असून यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न पाहिलेल्या गोष्टींचा अनुभव आभासी प्रयोगातून घेता येणार आहे. तसेच टॅबद्वारे अध्यापन, शैक्षणिक अॅप्स, सजीव मॉडेल्स,मराठी व इंग्रजी भाषेतील व्हिडिओज प्रेझेंटेशन, अॅनिमेशन, प्रयोगशाळेची डिजिटल टूर, व्हिआर हेडसेटमध्ये मोबाईल बसवून दिलेल्या अॅप्स/व्हिडिओज पाहणे, इन्फ्रानेट नसताना व्हिडिओचा वापर करणे (ऑफलाईन मोड) याची माहिती मिळणार आहे.
ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टीकोन, निरीक्षण क्षमता, सर्जनशीलता आणि कौशल्ये आत्मसात करण्यासाठी प्रभावी ठरणार असून शिक्षकांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन अध्यापन करणे व ग्रामीण भागात विज्ञानाचा प्रचार प्रसार होण्याच्या दृष्टीने आयोजित केलेली आहे.
माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली आणि ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक साधन केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या उपक्रमासाठी देवी माऊली शिक्षण प्रसारक मंडळ सोनुर्ली, शालेय समिती, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, सिंधुदुर्ग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग, गट शिक्षणाधिकारी पं.स.सावंतवाडी, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ,
शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व पालक या सर्वांचे सहकार्य मिळाले असून नावीन्यपूर्ण व आधुनिक कौशल्य प्राप्त करुन देणाऱ्या कार्यशाळेचा लाभ जिल्ह्यातील विद्यार्थी व विज्ञान शिक्षकांनी घ्यावा असे आवाहन कार्यशाळेचे समन्वयक तथा विज्ञान शिक्षक पांडुरंग काकतकर यांनी केले आहे.