
विरार : मतदानाला अवघे काही तास राहिलेले असताना विरारमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंवर पैसे वाटप केल्याचा आरोप झाला आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, त्यांचे पुत्र क्षितीज ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी तावडेंना विरारच्या विवांता हॉटेलमध्ये रोखून धरलं. तावडेंनी ५ कोटी रुपये वाटल्याचा आणि त्यांच्याकडे असलेल्या डायऱ्यांमध्ये १५ कोटी रुपयांची नोंद असल्याचा गंभीर आरोप ठाकूर यांच्याकडून करण्यात आलेला आहे.
बविआचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर यांनी या प्रकरणात बोलताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. विनोद तावडे विरारमध्ये येऊन ५ कोटी रुपये वाटणार असल्याची माहिती मला भाजपवाल्यांनी दिली होती. पण इतका मोठा राष्ट्रीय स्तरावरचा नेता असं करणार नाही, असं मला वाटलं. पण तरीही आम्ही हॉटेलात पोहोचलो. तर इथे विनोद तावडे आणि पैसे दोन्ही सापडले, असं ठाकूर यांनी सांगितलं.