
सिंधुदुर्ग : महायुतीला चांगल्या जागा स्पष्ट बहुमत या विधानसभेत मिळेल, याची मला खात्री आहे. विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीच्या काळात झालेलं काम आहे. कणकवली विधानसभेचे आमदार आणि सावंतवाडी विधानसभेचे आमदार दीपक केसरकर यांनी केलेलं काम पाहता आणि लोकसभेला मिळालेला प्रतिसाद पाहता सिंधुदुर्गातील तिन्ही जागा महायुती जिंकेल, असं चित्र आज स्पष्ट आहे. कार्यकर्त्यांनी उरलेल्या दिवसात मतदारांपर्यंत पोहचून मतदान अधिकाधिक कसं होईल, याविषयीची रचना आम्ही आखायला सुरुवात केलेली आहे. कोकणात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध विकासकामं झालेली आहेत. विकास कामांची यादी आणि मिळालेला निधी पाहिला तर कोकणात महायुतीचे सरकार उपयोगी आहे, हे यातून लोकांच्या मनात स्पष्ट बसलेलं आहे, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी व्यक्त केला. ते कणकवली इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवारांना लाडकी बहिण योजना नको !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरु केलेल्या लाडकी बहिण योजनेला राज्यातील माता भगिनी अभूतपूर्व प्रतिसाद देतायत. अशावेळी सिनियर नेते शरद पवार महायुती या योजनेवर इतके पैसे खर्च करतेय की बाकीच्या योजना बंद पडतायत, असं वक्तव्य करतायत याचा अर्थ त्यांना लाडकी बहिण योजना नकोय, पण महाविकास आघाडीनेचं आपल्या जाहीरनाम्यात पहिल्यांदा 3 हजार देऊ ही दुटप्पी भूमिका या नेत्यांची जनता जाणतेय, असा हल्लाबोल केला.
चाकरमान्यांना आवाहन
कोकणसाठी विशेषतः चाकरमान्यांना आग्रह आहे. आपल्या गावातील काम घेऊन आपण आमदारांना मुंबईत भेटतो. तशीच उपस्थिती मतदानावेळी आपली दिसली तर आपल्या गावचा विकास अधिक जोमाने होईल, हे चाकरमान्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि निवडणुकीच्या आधी गावी आलं पाहिजे, असं आवाहन केलं.
२०१४ आणि २०१९ सारखं वातावरण असेल
महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा अधिक चांगल्या जागा महायुतीच्या येतायत. त्यामुळे २०१४ आणि २०१९ सारखं वातावरण राज्याला मिळेल. विकासाचं चित्र राज्यात दिसेल, असा विश्वास व्यक्त केला.
कोकणी माणूस लक्ष देणार नाही !
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोणी मुद्दाम पाडलेला नाही. मात्र जी घटना घडली ती दुर्दैवी आहे, त्याची आवश्यक चौकशी सुरु आहे. कोकणातील माणूस इतका नक्की विचार करतो की आपल्याला विकासाच्या मुद्द्यावर मत द्यायची आहेत. कोणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या घटनेचे राजकारण केलं तर त्याच्याकडे तो लक्ष देणार नाही. असं मत त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मांडलं.
ठाकरेंनी गद्दारी केली नसती तर चित्र वेगळं असतं
कोकण पट्ट्यातून सर्वाधिक जागा 75 पैकी 60 च्या वर जागा महायुती जिंकेल, याची मला खात्री आहे. २०१९ ला भाजप - शिवसेना युतीला बहुमत मिळालं. त्यानंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली नसती जनादेशाशी तर आजचं चित्र जे राजकारणाचं दिसतं, ते दिसलं नसतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर असं कधीच झालं नसतं. पण एका खुर्चीसाठी हिंदुत्वाची साथ सोडत, हे उद्धव ठाकरे यांनी कसं स्वीकारलं याच आज सुद्धा मला कोडं आहे, अशी खदखद व्यक्त केली.
लोकसभेला संविधान बदलाच खोटं नरेटीव्ह
लोकसभेला संविधानाचं खोटं नरेटीव्ह सेट केलं गेलं. राहुल गांधी आणि खर्गेंच्या माध्यमातूनच नाही तर काही एनजीओ, अर्बन नक्षलवादच्या माध्यमातून हा एक मोठा कॅम्पेन झाला. मोदी आले तर घटना बदलतील, मोदी आले तर मदरशे बंद करतील, त्यासाठी पैसा विदेशातून दिला गेला होता. आम्हला घटना बदलायची होती तर २०१४ ला आमचं प्रचंड बहुमत होतं. २०१९ ला ही चांगलं बहुमत होतं, तर त्यावेळी नाही बदलली तर २०२४ नंतर कशी बदलू ? हे आम्ही लोकांपर्यंत जाऊन सांगितलंय. लोकांना ते पटलय, तरी सुद्धा काँग्रेस विरोधक, अर्बन नक्षल, विदेशी पैशांच्या माध्यमातून वोट जिहादचा प्रयत्न नक्की करतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
रिफायनरी, जैतापूरवरून ठाकरेंवर निशाणा
रिफायनरी, जैतापूर या प्रकल्पांमुळे स्थानिकांच नुकसान न होता या प्रकल्पांमधून मोठा रोजगार आमच्या कोकणातील तरुणांना मिळणार असेल तर तो प्रकल्प केला पाहिजे हीच भूमिका महायुतीने घेतली आहे. सरकार आलं की या प्रकल्पांबाबत उद्धव ठाकरेंची भूमिका वेगळी असते सरकार गेल की वेगळी असते. कोकणाचा जर खराच विकास करायचा असेल तर असं मतांसाठी राजकारण करणाऱ्यांना कोकणवासियांनी दूर ठेवलं पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
बॅग तपासणीवरून इतकी चिडचिड का ?
बॅग तपासणीवरून इतकी चिडचिड का करायची ? निवडणूक आयोगाचे कर्मचारी त्यांचं काम करतायत. त्यांनी वाटेल तर मोदींची बॅग तपासतील, अमित भाईंची बॅग तपासातील अनेक वेळा मुंबईच्या रस्त्यावरून जाताना माझी बग तपासली जाते. काही नेलं होतं बॅग का मधून ? असा खोचक सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केला.
नितेश राणेंच्या कामावर जनता खुश
कार्यकर्ते खुश आहेत. सर्वाधिक उपलब्ध असणारे आमचे आमदार आहेत. गावात येत असतात, भेटत असतात. हा फीडबॅक गावातील लोकांकडून गावातील लोकांकडून मिळतोय. हीच जमेची बाजू नितेश राणेंची आहे. त्यांच्यामाध्यामातून सर्वाधिक पैसा हा याठिकाणी आला. हा पैसा तेव्हाच येतो, ज्यावेळी आमदार अधिक सक्षम आणि सक्रीय असतो. नितेश राणेंच्या कामावर जनता खुश आहे. त्यामुळे नितेश राणे यांची हॅट्रीक पूर्ण करतील, असा विश्वास व्यक्त केला.
निवडणूकानंतर ठरेल मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ?
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढतोय. निवडणुका झाल्यावर कोणाचे किती मंत्री असतील, मुख्यमंत्री कोण असेल याची चर्चा निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि भाजपचं कॅबिनेट एकत्र बसून चर्चा करतील, असं ठरलेलं आहे.