
सावंतवाडी : सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील बेरोजगारी वाढला जबाबदार खासदार विनायक राऊत आहेत. ते या पापाचे धनी आहेत. निधी कसा आणावा याची कल्पना देखील त्यांना नाही. केवळ रिफानरी, सी-वर्ल्ड सारख्या विकासकामांना विरोध करणारे विकासात तंटा आणणारे ते खासदार होते. त्यामुळे आता तंटामुक्त खासदाराची गरज आहे असं मत माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केल. तर रत्नागिरी सिंधुदुर्गचा उमेदवार दातृत्व, कर्तुत्व आणि वकृत्व असणारा असेल असा दावा त्यांनी केला.
ते म्हणाले, सिंधुदुर्ग-रत्नागिरीचा खासदार हा भारतीय जनता पार्टीचा असावा यासाठी आम्ही आग्रही आहोत. दातृत्व, कर्तुत्व आणि वकृत्व असणारा आमचा उमेदवार असेल, महायुतीचा उमेदवार म्हणून आम्ही ही निवडणूक लढू. अनेक जण या जागेसाठी इच्छुक आहे. इच्छुक असण गैर नाही. भाजप आणि शिवसेनेचे वरिष्ठ जो उमेदवार देतील तो आम्ही निवडून आणू असा विश्वास भाजपचे लोकसभा मतदारसंघ प्रमुख, माजी आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला. तर सिंधुदुर्ग-रत्नागिरी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा गड असून आमची पहिली पसंती त्यांना आहे असं मत श्री. जठार यांनी व्यक्त केल.
ते म्हणाले, कोकणात विशेषत: सिंधुदुर्ग-रत्नागिरीत बेरोजगारी वाढली. युवकांना गोव्यात जाव लागत आहे. या पापाचे धनी खासदार विनायक राऊत आहेत. रिफानरी, सी-वर्ल्डला विरोध करणारे विकासात तंटा आणणारे खासदार राऊत होते. त्यामुळे आता तंटामुक्त खासदाराची गरज आहे. तर कोकणात ग्रीन रिफायनरीला विरोध करणाऱ्या उद्धव ठाकरेंना कोकणी माणूस मोठा झालेला नको होता. इथे रिफायनरी नको म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना अंबानींच्या जामनगरमधील रिफायनरीत प्रदुषण दिसलं नाही का ? तीच कंपनी तोच प्रोजेक्ट जामनगरमध्ये झाला. बाळराजे आदित्य, उद्धव ठाकरे सपत्नीक तिथे गेले. यातून उद्धव ठाकरेंना अंबानी चालतात पण कोकणी माणूस मोठा झालेला चालत नाही हे दिसून आल्याचे जठार म्हणाले.
तर, आता विकासात तंटा निर्माण करणारा खासदार नको आहे. प्रकल्प आणणारा खासदार हवा आहे. दहा वर्षापूर्वी मला शिवसेनेतून खासदारकी लढण्यासाठी उद्धव ठाकरेंकडे विनायक राऊत घेऊन गेले होते. त्यावेळी राऊंतांची शिफारस मी केली होती. त्यांचा प्रचार करत त्यांना निवडून आणल त्याचा आज पश्चात्ताप होतो असं मत जठार यांनी व्यक्त केले. आम्ही महायुती म्हणून एकत्र होतो. मात्र, नंतर युतीत काडीमोड झाला. आज हेच लोक वीर सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्या राहूल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. भाषणाच्या सुरूवातीला हिंदुत्वाचा उल्लेख करत नाही आहेत. स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेनी जे कामवल ते गमावायच काम उद्धव ठाकरे करत आहेत. खासदार राऊत यांनी यावर भाष्य करावे असं आव्हान माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिल.
दरम्यान, शासन दरबारी काजूला हमीभाव मिळावा यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकारच्या यादीत काजू पिकाचा समावेश नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. परंतू आमचं सरकार निश्चित काजूला हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. तोवर तातडीचा दिलासा म्हणून अनुदान या रुपाने दीड लाख काजू शेतकऱ्यांना किलो मागे दहा रूपये देण्यात येणार आहे. दोन हजार किलोपर्यंट दहा रूपये प्रमाणे या शेतकऱ्यांना ३०० कोटी देण्याची तरतूद सरकारनं केल्याची माहिती प्रमोद जठार यांनी दिली. याप्रसंगी माजी आमदार राजन तेली, महेश सारंग, अजय गोंदावळे, आनंद नेवगी, अजय सावंत, विनोद सावंत आदी उपस्थित होते.