पक्षात गटबाजीला थारा नसेल

विनायक राऊतांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 15, 2024 15:13 PM
views 99  views

मालवण : लोकसभा निवडणुकीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून झालेला निष्काळजीपणा आणि मतदारांना गृहीत धरल्यामुळेच आपल्याला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र यापुढील काळात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये असा दुर्लक्षपणा चालणार नाही. पदाधिकाऱ्यांनी बॉसिंग गिरी न करता सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना घेऊनच काम करावे. पक्षात गटबाजीला थारा नसेल. सर्वांनी संघटना म्हणून काम करायला हवे असे सांगत माजी खासदार विनायक राऊत यांनी पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. 


लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महाविकास आघाडीची चिंतन बैठक आज दुपारी कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी येथे झाली. यावेळी खासदार विनायक राऊत, उपनेते अरूण दूधवडकर, आमदार वैभव नाईक, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, काँग्रेस तालुकाप्रमुख मेघनाथ धुरी, बाळू अंधारी, शहरप्रमुख बाबी जोगी, श्रीकृष्ण तळवडेकर, नितिन वाळके, उपतालुकाप्रमुख पराग नार्वेकर, भाऊ परब, महिला तालुकाप्रमुख श्वेता सावंत, महिला तालुका समन्वयक पूनम चव्हाण, महिला शहरप्रमुख रश्मी परुळेकर, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, युवासेना उपतालुकाप्रमुख अमित भोगले, मंगेश टेमकर, विभागप्रमुख समीर लब्दे, विजय पालव, राजेश गावकर, बंडू चव्हाण, भगवान लुडबे, भारती आडकर, स्नेहा शेलटकर, आर्या गावकर, विद्या फर्नांडिस यांच्यासह तालुक्यातील अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

श्री. राऊत म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर नैराश्याच्या भावनेतून बाहेर येऊन आपल्या कर्तव्याला न्याय देण्याची वेळ आली आहे. ही गरज ओळखून शिवसैनिकांनी पुन्हा कामाला लागावे. लोकसभा निवडणुकीत पहिल्या दोन टप्प्यातील निवडणूका झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यापासून भाजपने आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी एक कपट नीती वापरली. या कपट नितीत दुर्देवाने आपण बळी गेलो. यात पराभव स्वीकारावा लागला. कोकण किनारपट्टी ही शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. दुर्दैवाने या कोकण किनारपट्टीत आपल्याला खूप मोठा सेटबॅक बसला आहे. निवडणुकीत ज्या काही चुका झाल्या आहेत. त्याचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे. ती काळाची गरज आहे. या निवडणुकीत जी निष्क्रियता दिसून आली ती आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये कायम राहिली तर त्याचा गंभीर परिणाम भोगावा लागेल. त्यामुळे आजपासून पुढील सहा महिन्यांमध्ये कार्यकर्त्यांच्या निवडणुका येणार आहेत. त्या कार्यकर्त्यांना उभे ठेवायचे असेल तर त्यांना मोठ्या जिद्दीने उभे करण्याचे कर्तव्य प्रमुख पदाधिकाऱ्यांचे आहे. निवडणुकीत पराभव झाला असला तरी दुःखात खचून जाता नये. दुःख पचविण्याची ताकद प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये असायला हवी. ते दुःख पचविताना आपण नेमके कुठे कमी पडलो, काय करायला हवे होते याचे अवलोकन करायला हवे. 

मालवणातून मतमोजणीसाठी प्रतिनिधी न आल्याबाबत खंत व्यक्त करत ते का आले नाहीत याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. निवडणुकीच्या पराभवाची चाहूल मालवणला लागली का? म्हणून तुम्ही मतमोजणीपासून दूर गेला का?असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख असतील तुम्हाला तुमच्या पदाला न्याय हा द्यावाच लागेल. अधिकाधिक उपयोगी ठरणारी जी माणसे आहेत, कार्यकर्ते आहेत त्यांना सांभाळून घ्यावे लागेल. त्यांना पक्षाच्या कार्यात विलीन करून घ्यावे लागेल. ज्याच्यात कर्तृत्व, क्षमता आहे अशा प्रत्येकाचा उपयोग करून घेण्याची आवश्यकता आहे. हे न केल्यास भविष्यात आपल्या पदरी अनेक अपयश पडण्याची भीती आहे. जी चूक झाली ती चूक येत्या विधानसभेच्या निवडणुकीत सुधारावी लागेल. हे करताना जे कार्यक्षम आहेत त्यांचा सल्ला, मार्गदर्शन घ्यावे लागेल. कारण शिवसेना हा एक परिवार आहे. त्यामुळे या दृष्टीने प्रत्येकाने काम करण्याची गरज आहे असे श्री. राऊत यांनी स्पष्ट केले. 

ते म्हणाले, एका निवडणुकीत आपला पराभव झाला म्हणजे कोकणातून आपण हद्दपार झालो असे नाही. एकही पैसा न वाटता आपल्याला चार लाखाहून अधिक मते मिळाली तर विरोधकांना दीडशे कोटी खर्च करून साडे चार लाख मते मिळाली एवढाच फरक. यात आपण केवळ भावनाविवश झालो. आपल्या उमेदवाराचा विजय होणारच आहे असे म्हणत गाफील राहिलो. त्यामुळे पराभव झाला. मात्र यापुढील निवडणुकांमध्ये असे गाफील राहून चालणार नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात मिळालेले यश हे सर्व धर्मियांचे आहे. विरोधक आमच्यावर मुस्लिम मते घेऊन निवडून आल्याचा आरोप करत आहेत. याच मुस्लिम मतांचे आर्जव करण्यासाठी राज्य सरकारने वफ्व बोर्डाच्या इमारतीला १० कोटी रुपये मंजूर करत दोन कोटींचा निधीही वितरित केला. इंडिया आघाडीकडे मोठ्या संख्येने जो मतदार आकर्षित झाला आहे. या मतदारांना संभ्रमावस्थेत टाकणे, त्यांना फसविणे अशी नीती केंद्र, राज्य सरकार वापरत आहे. मात्र चंद्राबाबू नायडू व नितीशकुमार हे देशात भाजपचे सरकार चालू देतील असे वाटत नाही. 

येत्या काळात विधानसभा निवडणूक तसेच पुढील काळात अन्य निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मालवण तालुक्यात शिवसेना पक्ष संघटना वाढविण्यावर भर देण्याची गरज आहे. विरोधकांच्या घाणेरड्या वृत्तीला टक्कर द्यायची असेल तर प्रत्येकाला आपले कर्तृत्व सिद्ध करावे लागेल. या कर्तृत्वाला चालना देण्याचे काम जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, विभाग प्रमुख, युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी करायला हवे. येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीचा उमेदवार विजयी व्हायला हवा यादृष्टीने सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आजपासूनच कामाला लागावे अशा सूचना माजी खासदार श्री. राऊत यांनी यावेळी दिल्या. 


लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला असला तरी कोकण हे आपले घर आहे. कोकण हा माझा परिवार आहे. त्यामुळे या परिवाराला भेटण्यासाठी पुढील महिन्यात आपण जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले असल्याचे श्री. राऊत यांनी यावेळी सांगितले. 


आमदार नाईक म्हणाले, लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांना कुडाळ- मालवण मतदार संघातून मोठे मताधिक्य मिळाले नाही याबाबद्दल इंडिया आघाडीच्या वतीने माफी मागत आहे. या निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या येत्या निवडणुकांमध्ये होणार नाही याची दक्षता सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते घेऊन यापुढे जोमाने कार्यरत राहतील. यावेळी इर्शाद शेख, नितीन वाळके, जान्हवी सावंत अन्य पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.