
कुडाळ : पिंगुळी येथील पाझर तलावाच्या अस्तित्वाचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. तलावाच्या परिसरात होणाऱ्या मोठ्या गृहप्रकल्पामुळे भविष्यात पाणी दूषित होण्याचा आणि पाणीटंचाई निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या प्रश्नी सरपंच जर खरोखरच गावाच्या बाजूने असतील, तर त्यांनी १ मे रोजी होणाऱ्या उपोषणात सहभागी व्हावे, अन्यथा आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आक्रमक मागणी पिंगुळीचे जिल्हा परिषद सदस्य गंगाराम उर्फ गुरु सडवेलकर आणि ग्रामस्थांनी केली आहे.
बुधवारी सायंकाळी कुडाळ एमआयडीसी विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत सडवेलकर बोलत होते. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, ग्रामपंचायत सदस्य तुळशीदास पिंगुळकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
सडवेलकर यांनी पुराव्यांसह माहिती देताना सांगितले की, पिंगुळी पाझर तलाव परिसरात सुमारे २५ एकर क्षेत्रात २७५ सदनिकांचा मोठा प्रकल्प उभा राहत आहे. या प्रकल्पामुळे खालील समस्या उद्भवू शकतात:
पाणी दूषण: सदनिकांमधील सांडपाणी थेट तलावात गेल्याने पाण्याचे स्रोत दूषित होतील.
पाणीपुरवठा विस्कळीत: या तलावावर गावातील ३ हजार ग्राहक आणि १० ते १५ हजार ग्रामस्थांची नळपाणी योजना अवलंबून आहे.
गाळ साचणे: बांधकामासाठी जमिनीची उलथापालथ झाल्याने माती तलावात जाऊन साठवण क्षमता कमी होईल.
तातडीची हानी: विकासकाने नळ योजनेच्या वीज वाहिनीतून अनधिकृतपणे वीज कनेक्शन घेतले असून, पाईपलाईनही उघडी पाडली आहे.
"तलावाच्या सभोवतालची जमीन खाजगी मालकीची झाल्याने भविष्यात पाईपलाईन दुरुस्तीसाठीही जागा उरणार नाही. तलावाची मालकी कागदोपत्री शासनाची असली तरी ताबा खाजगी विकासकाचा राहणार आहे," असे सडवेलकर यांनी नमूद केले. तसेच, विकासकाला एनओसी देण्यासाठी १३ मे २०२५ रोजी झालेल्या बैठकीत अनेक त्रुटी होत्या. या एनओसीला सूचक-अनुमोदक नसल्याचे पुरावेही त्यांनी यावेळी सादर केले.
या लढ्यात कोणतेही पक्षीय राजकारण नसून हे केवळ लोकांचे आंदोलन असल्याचे स्पष्ट करण्यात आले. १३ मे च्या बैठकीला उपस्थित असलेले सदस्य आता सरपंचांसोबत का नाहीत, असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला.
पिंगुळी ग्रामस्थांनी या अन्यायाविरोधात १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात सरपंच सहभागी होऊन गावाचा पाठिंबा देतात की ग्रामस्थांच्या मागणीनुसार राजीनामा देतात, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.










