जि.प.अध्यक्ष, सभापती लग्नाला गेलेले असताना बैठक होती कोणासोबत ?

नंदन वेंगुर्लेकर यांचा सवाल
Edited by: विनायक गांवस
Published on: April 30, 2026 12:25 PM
views 151  views

  • आरोग्य दरबारात अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे रोष

सावंतवाडी : जिल्हा परिषद अध्यक्ष अन् आरोग्य सभापती आम्हाला लग्नाला जाणार असल्याचे कारण सांगून आरोग्य जनता दरबारातून गेलेले असताना जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक नेमकी कोणासोबत होती ? असा सवाल करत आरोग्य विभागाकडून सुचना असूनही जनता आरोग्य दरबाराला अनुपस्थित राहणाऱ्या जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची दुसऱ्या जिल्ह्यात बदली करा अशी मागणी नंदन वेंगुर्लेकर यांनी केली. जिल्हास्तरीय जनता आरोग्य दरबाराला जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी उपस्थित न राहिल्याने आज सावंतवाडीच्या बॅ. नाथ पै सभागृहात आयोजक सामाजिक संस्थांसह बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबूडकर यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. 

जनता आरोग्य दरबाराला पालकमंत्री नितेश राणे कॅबिनेट बैठकीमुळे उपस्थित न राहिल्याने आज त्यांनी ही बैठक आयोजित केली होती. आजच्या या बैठकीस पालकमंत्री यांचे शासकीय प्रतिनिधी उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी अनुपस्थित असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली. यावेळी श्री. खेबुडकर यांनी अधिकारी बैठकांमुळे येऊ शकले नाहीत. लोकप्रतिनिधींच्या नियोजित बैठका असल्याने अधिकारी वर्गाला जाव लागत. मात्र, तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही आहोत. काल येऊ शकलो नसल्याने दिलगीरी व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव म्हणाले, आम्ही दिवस-रात्र न बघता रुग्णसेवेत काम करतो. लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी त्या सोडविण्यासाठी कालचा आरोग्य दरबार आयोजित केला असताना उत्तर देणारे जबाबदार लोक येत नसली तर उपयोग काय ? असा सवाल केला. तर व्हेंटिलेटर न मिळाल्याने जिल्ह्यातील एका युवतीला अपंगत्व आल असून आज त्यांच आयुष्य उद्ध्वस्त झाल आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी काल कोणी नसल्याने त्या आज पुन्हा आल्या आहेत. एकीकडे, आमदार दीपक केसरकर येऊन उत्तर देत असताना अधिकारी येत नसतील तर कालच्या सभेच इतिवृत्त होणार कस ? आमदारांच्या उपस्थितीला महत्त्व नाही का ? असा सवाल उपस्थितांकडून करण्यात आला. यावेळी कालच्या सभेमध्ये उपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हे इतिवृत्त लिहावं अशा सुचना सीईओंनी दिल्या.

दरम्यान, मंत्रालय स्तरावरून सूचना आलेल्या असताना उपस्थित न राहणाऱ्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांना कारणे दाखवा नोटीस काढा,  त्यांची दुसऱ्या जिल्ह्यात बदली करा. साडे ९ हजार लोक आरोग्य यंत्रणेच्या कुचकामीपणामुळे दगावले असून एवढी गंभीर परिस्थिती असताना जिल्हा नियोजनसह जिल्हा परिषदेमधून आरोग्य यंत्रणेसाठी किती निधी दिला जातो ? असा सवाल नंदन वेंगुर्लेकर यांनी केला. तसेच आरोग्य सुविधांअभावी लोकांचे जीव जात असताना उपचारासाठी गोव्यावर अवलंबून राहण्याची वेळ असताना जनतेच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी अधिकारी उपस्थित राहत नसतील तर आम्ही समजायचं काय ? असा सवाल उपस्थितांकडून करण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबूडकर, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, सभापती प्रतिक बांदेकर, कृती समितीचे एन.बी. रेडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ‌. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव, नंदन वेंगुर्लेकर, राजू केळुसकर, प्रा. सुभाष गोवेकर, रविंद्र ओगले, रूपा मुद्राळे आदींसह उपजिल्हा रुग्णालय कृती समिती सावंतवाडी, अभिनव फाऊंडेशन, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान आदींचे सदस्य उपस्थित होते.