वेताळ बांबर्डेच्या हातेरी नदीने घेतला मोकळा श्वास

गाळ उपसा पूर्ण झाल्याने पुराचा धोका टळणार !
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: April 30, 2026 13:22 PM
views 40  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे गावाला दरवर्षी पावसाळ्यात हातेरी नदीच्या महापुराचा मोठा तडाखा बसतो. मात्र, यंदा पावसाळ्यापूर्वीच ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश आले असून, "नाम फाऊंडेशन", "टाटा मोटर्स" आणि प्रशासनाच्या संयुक्त पुढाकारातून नदीतील गाळ उपसा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. या कामामुळे मुंबई-गोवा महामार्गालगतच्या तेलीवाडी परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पुराच्या समस्येतून मिळणार सुटका

गेल्या अनेक वर्षांपासून हातेरी नदीत मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पावसाळ्यात नदीचे पात्र उथळ होऊन पाणी लगतच्या वस्तीत शिरत होते. प्रामुख्याने तेलीवाडी येथील घरे आणि शेतीचे यामुळे अतोनात नुकसान होत होते. जमिनीची धूप होण्याचे प्रमाणही वाढले होते. या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.

१५ दिवसांचे अथक प्रयत्न

नाम फाऊंडेशन आणि टाटा मोटर्स यांच्या सहकार्याने गेल्या १५ दिवसांपासून नदीतील गाळ उपशाचे काम युद्धपातळीवर सुरू होते. पहिल्या टप्प्यातील काम आता पूर्ण झाले असून, नदीचे पात्र मोकळे झाल्याने पाण्याचा निचरा वेगाने होण्यास मदत होणार आहे. यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पूरस्थितीवर नियंत्रण मिळवता येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.