
सावंतवाडी : दीपक केसरकर यांनी ५० एकर कोणतीही जागा दिली नाही. जिल्हा परिषदेची अशी कोणतीही जागा या आधी कधीही अस्तित्वात नव्हती किंवा आज आहे. ते वक्तव्य केवळ इमोशनल व खोट आहे. २६ जुलै रोजी ठरल्याप्रमाणे सर्वे क्र.१९ व २० मधील जागा ही ग्रामस्थांना वाटप केली जाईल. कारण त्याठिकाणी आमच्या शेती, वाडे व घरे आहेत. ज्या जमीनी ते आरक्षित करू पाहतात त्यावर आमची वहिवाट, ऊस व शेती आहे. पर्यटनासाठी लागणारी आवश्यक्य जागा गावाने राखीव ठेवली आहे. २३ हेक्टरवर आरक्षण टाकायला कावळेशेत अखंड २३ हेक्टरवर पसरलेले नाही. परंतु त्यांना ही एकत्र २३ हेक्टर जागा हवी आहे. मात्र, आता आमच्या हक्काच्या जमीनी आम्हाला मिळायच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे मंत्री केसरकर यांनी आता सहकार्य करावं, अन्यथा प्रसंगी त्यांना गावबंदीचा निर्णय देखील घ्यावा लागेल असा इशारा ग्रामस्थ मनोहर बंड यांनी दिला आहे. गेळे येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, गेली कित्येक वर्षे आम्ही जमिनीसाठी लढा देत आहोत. दीपक केसरकर यांनी सुरूवातीच्या काळात आम्हाला मदत केली. परंतु, कावळेसाद पॉईंटलगतच्या 19 व 20 सर्व्हे नं. च्या मागणीला आम्ही मान्यता देणार नाही. ती जागा आमच्या शेतकऱ्यांची आहे ती तशीच राहील. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी व महसूल मंत्री यांच्याशी झालेल्या बोलणीनंतर आमचा विश्वास वाढलेला आहे. संदिप गावडे यांनी यासाठी लढा दिला आहे. १५ ऑगस्टला पहीला सातबारा हाती येईल असा त्यांचा विश्वास आहे, तो सार्थकी लागेल. यापुढे लढ्यासाठी आम्ही काही शिल्लक ठेवलेल नाही. हा शेवटचा लढा आहे. जमीनीच वाटप न झाल्यास कावळेसाद पॉईंट बंद करू असा इशारा ग्रामस्थ मनोहर बंड यांनी दिला. तर दीपक केसरकर यांचे ग्रामस्थांशी चांगले संबंध आहेत. जमिनीच्या बाबतीत ते संबंध बिघडवत असतील तर प्रसंगी त्यांना गावबंदी करू असा इशारा दिला. आमची स्थानिक भुमित्रांची ही भूमिका आहे अस तातोबा बंड म्हणाले.
यावेळी ग्रामस्थ तातोबा गवस म्हणाले, जमिनी नावावर नसल्याने योजनेचा लाभ आम्हाला मिळत नाही. मंत्रालयात दीपक केसरकर यांच्यासह बैठका झाल्या पण त्यात निष्पन्न काही झाल नाही. आता तोडगा निघत असताना दीपक केसरकर यांनी आम्हाला साथ द्यावी. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी महसूल मंत्री यांच्याशी बोलून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे पालकमंत्री यांना आमदारांनी साथ द्यावी. पोट मारून पर्यटन आम्हाला नकोय. जर तुम्हाला काही बांधायच असेल तर कावळेसादच का? इतरही जमिनी आहेत. हा निसर्गसौंदर्याने संपन्न भाग तसाच अबाधित ठेवावा. ५ एकर जमिन आम्ही ग्रामस्थांनीच पर्यटनाला सोडली आहे. त्यासाठी ७० एकर जमिनीची आवश्यकता नाही. निसर्ग जपण्यासाठी आमचा पुढाकार राहील असं मत व्यक्त केले.
लाडक्या बहिणीची साथ
आमचे भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिण म्हणून पैसे नाही दिले तरी चालतील. पण, आमच्या हक्काच्या जमिनी आम्हाला द्यावात, त्या जमिनींसाठी आम्ही गेली अनेक वर्षे लढत आहोत. शासन व वनसंज्ञेत आमच्या जमीनी अडकल्यात. त्यामुळे २५९ कुटुंबांना जागा वाटप करून लाडक्या बहिणीला ओवाळणी घालावी अशी साद येथील महिलेन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घातली. यावेळी प्रमुख ग्रामस्थ नारायण गवस, मनोहर बंड, महादेव पवार, तातोबा गवस, नारायण गवस, सरपंच सागर ढोकरे, उपसरपंच विजय गवस आदी उपस्थित होते.