आयी आरोग्य उपकेंद्र कारभाराबाबत ग्रामस्थ संतप्त | १९ जूनला उपोषण छेडण्याचा सरपंचांचा इशारा

Edited by: संदीप देसाई
Published on: June 11, 2023 19:53 PM
views 154  views

दोडामार्ग : गेल्या सहा महिन्यांपासून  आयी आरोग्य उपकेंद्रात कर्मचारीच उपस्थित नसल्याने तेथील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे येथे तत्काळ आरोग्य कर्मचारी नेमून आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून न दिल्यास १९ जूनपासून उपकेंद्रासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा आयी गावचे सरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी दिला आहे.

याबाबत ८ जून ला पंचायत समिती व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना सरपंच यांनी निवेदन दिल आहे. आयी येथील आरोग्य उपकेंद्र सातत्याने बंद असल्याने प्राथमिक उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची  हेळसांड होत आहे. आरोग्य सेवा खरे तर अत्यावश्यक सेवा आहे मात्र आयी येथील आरोग्य उपकेंद्रामध्ये कोणीच कर्मचारी उपस्थित राहत नसल्याचे सरपंच यांनी निवेदनात नमूद केले आहे. जवळपास सहा महिन्यांपासून आरोग्य उपकेंद्र बंद आहे. आयी गावातील आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपकेंद्रात उपचारासाठी येत असतात. प्राथमिक सेवा म्हणून उपकेंद्रात प्रथमोपचारासाठी लागणारी औषधेसुध्दा मिळत नाहीत.  त्यामुळे आयी गावातील आणि पंचक्रोशीतील रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे तत्काळ उपकेंद्र सुरु करावे, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांच्यासह आवश्यक औषध साठाही तातडीने व पुरेसा उपलब्ध ठेवावा अन्यथा १९ पासून उपोषण छेडण्याचा इशारा सरपंच यांनी दिला आहे. 


सरपंच आणि ग्रामसेवक आयी उपकेंद्राशी संबंधित आरोग्य सेवकाला विचारणा केली असता, त्याने उपकेंद्रात उपस्थित राहण्याची जबाबदारी माझी नाही, मी फिरतीवर असतो असे उत्तर दिल्याचे सरपंच यांचं म्हणणं असून त्यांच्या उत्तराने ग्रामस्थही संतप्त झाले आहेत. एकूणच आरोग्य खात्याच्या गलथान कारभारामुळे आयी गावातील आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थाच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे सर्व संबंधितांना सरपंचांच्या सहीने पत्र देण्यात आले असून आपण उपोषणावर ठाम असल्याचा आक्रमक पवित्रा सामाजिक कार्यकर्ते बबलू पांगम यांनी घेतला आहे. आयी ते दोडामार्ग १२ किलोमीटर अंतर आहे. रात्री-अपरात्री दोडामार्गला जाणे आयी आणि पंचक्रोशीतील दुर्गम भागात राहणाऱ्या ग्रामस्थांना शक्य नव्हते, म्हणून सातत्याने उपकेंद्राची मागणी होत होती. सामाजिक कार्यकर्ते कांता पर्येकर, दिवंगत भरत जाधव, तत्कालीन सरपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आदींनी सातत्याने पाठपुरावा केल्याने उपकेंद्र मंजूर झाले. उपकेंद्रामुळे गावकऱ्यांना आरोग्य सेवा मिळत होती; मात्र अचानक उपकेंद्र बंद राहू लागल्याने नागरिकांची गैरसोय होत असून याप्रश्नी सरपंच आहिर यांसह ग्रामपंचायत पदाधिकारी व बबलू पांगम यांनी उपोषणाचा इशारा दिलाय.