
दोडामार्ग : परमे येथील मे. एम. व्यंकटराव इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीची अवैध प्रकारे सुरू असलेली क्रशर खाण व बेकायदेशीर होत असलेली अवैध खडी वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी, या मागणीसाठी शैलेश बोर्डेकर व ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी येथील रस्त्यालगत उपोषण छेडले होते. तहसीलदारांनी दिलेल्या लेखी आश्वासानंतर ग्रामस्थांनी आपले उपोषण दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी मागे घेतले.
गाव मौजे परमे येथे मे. एम व्यंकटराव इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि कंपनीची बेकायदेशीर अवैध दगड क्वारी चालू आहे. या कंपनीला दगड क्वारी काढण्यासाठी परवानगी कधी व कोणत्या वर्षी दिली गेली आहे? दिलेल्या मुदतीमध्ये चालू आहे का? चालू असल्यास कधी पर्यंत मुदत आहे? मुदत संपल्यास नूतनीकरण कोणत्या वर्षी झाले? मुदत संपल्यास बेकायदेशीर अवैध क्वारीस दंडात्मक कारवाई होणार का ? गावातील ग्रामस्थांचा विरोध असताना बेकायदेशीर खडी वाहतूक भेडशी परमे पणतुर्ली ग्रा. मा. ५४ रस्त्यावरून कोणाच्या परवानगीने चालू आहे? हा रस्ता अरुंद आहे. रस्त्याचे काम चालू आहे, असे असताना दादागिरी करुन बेकायदेशीर खडी वाहतूक केली जाते. हे योग्य नसून प्रशासन त्यांना खतपाणी घालते का? असा प्रश्न उपस्थित करत कायदा सुव्यवस्था राखणे पोलीस यंत्रणचे काम असताना पोलीस प्रशासन बेकायदेशीर अवैध वाहतूक करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे, असे आरोप करत ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी उपोषण छेडले होते.
कंपनी दांडगाईने वाहतूक करत असल्याने संतप्त ग्रामस्थांनी जेसीबीच्या साह्याने खंदक मारून त्यांच्या वाहतुकीला लगाम घातला होता. काहीही झाले तरी संबंधित क्वारीवर महसूल प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी लावून धरल्याने हे उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू होते. मे. एम व्यंकटराव इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि कंपनीला काळा दगड खाण परवाना न देणेबाबत ग्रामपंचायत ठराव घेणेत आलेला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत परवानगी देत नाही, तोपर्यंत काळा दगड उत्खननास व वाहतुकीस परवानगी देऊ नये असे पत्र जिल्हाधिकारी व जिल्हा खनिकर्म अधिकारी यांना देण्यात आले आहे. त्याबाबतची एक प्रत उपोषणकर्त्यांना सुधीर दळवी यांनी दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी दुपारी उपोषण मागे घेण्यात आले.