गावचा सत्तासंघर्ष | कंदील प्रचारात कोण कोणाचं पारडं फिरवणार ? 'टाईट फिल्डिंग' कोण कोण भेदणार ?

काऊंट डाऊन सुरू ! पक्ष, गट आणि नेत्यांची प्रतिष्ठा पणाला !
Edited by: भरत केसरकर
Published on: December 16, 2022 21:42 PM
views 137  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 293 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत असून आज रात्री दहा वाजता जाहीर प्रचाराची सांगता झाली. प्रचाराच्या तोफा थंडावल्यानंतर आज शुक्रवारी व उद्या शनिवार रात्री कंदील प्रचाराला जोर येणार आहे. उद्या शनिवार प्रचार बंद असला तरी प्रत्यक्ष भेटीवर उमेदवार भर देणार आहेत. उद्या सकाळपासून व आज रात्रीपासून कंदील प्रचाराला सुरुवात झाली आहे.


जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 293 ग्रामपंचायतीच्या निवडणुक अतिशय चुरशीच्या होत आहेत. यामध्ये भाजप विरुद्ध शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडी अशी थेट लढत असताना काही ठिकाणी गाव विकास पॅनलने शड्डू ठोकला आहे. मात्र भाजप सर्वाधिक 293 ही जागावर स्वबळावर लढत असून काही ठिकाणी शिंदे गटाची त्यांची थेट युती झालेली पाहायला मिळत आहे. तर शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी होत असताना अंतिम क्षणाला वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला पाहायला मिळत आहे.


कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात आमदार नितेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून आमदार नितेश राणे गेले एक ते दीड महिना स्वतः या मतदारसंघातील सर्व ग्रामपंचायतच्या प्रचारामध्ये उतरलेले पाहायला मिळाले. सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला या विधानसभा मतदारसंघात आमदार दीपक केसरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून दीपक केसरकर मात्र एकाही ग्रामपंचायतच्या प्रचाराला फिरकले नसल्याच चित्र पाहायला मिळाल. या उलट शिवसेनेचे विक्रांत सावंत, शैलेश परब यांच्यासह सेनेने मातब्बर नेते या ग्रामपंचायत निवडणूकमध्ये उतरलेले होते. तर भाजपचे संजू परब, महेश सारंग यासह दिग्गज नेत्यांनी या निवडणुकांसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघासाठी माजी खासदार निलेश राणे स्वतः ठाण मांडून आहेत. तर शिवसेनेचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी या दोन्ही तालुक्यातील तब्बल 110 ग्रामपंचायतसाठी जोरदार प्रचार यंत्रणा राबवली आहे. शिवसेनेने कुडाळ मालवण वर अनेक ग्रामपंचायती ताब्यात येतील, असा दावा जरी केला असला तरी भाजप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शड्डू ठोकून असल्याचा पाहायला मिळालं.


दीपक केसरकर यांनी या सगळ्या निवडणूक यंत्रणेकडे पाठ फिरवल्याने याची जोरदार चर्चा सावंतवाडी दोडामार्ग व वेंगुर्ला या तिन्ही तालुक्यात सुरू होती. मात्र दीपक केसरकर यांचे काही खंदे समर्थक आणि शिंदे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी वेंगुर्ला सावंतवाडी दोडामार्गमधील काही ग्रामपंचायती थेट लढवत शिवसेनेसह महाविकास आघाडी समोर आव्हान निर्माण केल आहे.