
बांदा : गेली २० वर्ष देशसेवेसाठी सीमेवर झटल्यानंतर आता जनसेवेसाठी बांदा येथील माजी सैनिक निलेश सावंत ग्रामपंचायत निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहेत. समाजकार्यासह अंध-अपंगांसाठी कार्य, हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे नेण्यासह युवा पिढीच्या मनात देशप्रेम जागृत ठेवण्यासाठी माजी सैनिक निलेश सावंत कार्यरत आहेत. दरम्यान, प्रभाग क्रमांक चार मधून ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ते निवडणूक लढवत आहेत. प्रभाग चार मध्ये अपक्ष असून देखिल त्यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे.
मागील २० वर्षांच्या देशसेवा केली. २०१५ ला निवृत्त झाल्यानंतर सामाजिक कार्य कायम सुरू ठेवलं. बांदा गावात पुरपरिस्थिती, कोरोनाकाळात मैदानात उतरत जनतेला धीर दिला. अंध-अपंग बांधवांसह, निराधार, गोरगरीब जनतेचा आधार होण्यासाठी प्रयत्न केले. सामाजिक कामात नेहमी अग्रेसर राहिलो. परंतु, सामाजिक काम करत असताना राजकारणाची जोड असणं आवश्यक आहे याची जाणीव झाली. कारण, प्रभागातील काही गोष्टींची कमतरता, विकास करण्यासाठी आपण ग्रामपंचायतीत असणं आवश्यक आहे याची जाणीव झाली. त्यामुळे प्रभाग क्रमांक ४ मधून मी अपक्ष उमेदवार म्हणून उभा राहिलो. मला खात्री आहे, प्रभाग क्रमांक ४ मधील माझे मतदार मला बहुमताने विजयी करून आपला हक्काचा सदस्य म्हणून ग्रामपंचायतीत नेतृत्व करण्याची संधी देतील असा विश्वास माजी सैनिक निलेश सावंत यांनी व्यक्त केला. माझे मतदार, कुटुंबिय, मित्रपरिवार यांच्या आशीर्वादानं माझी इच्छा नक्कीच पूर्णत्वास येईल असं मत त्यांनी व्यक्त केल.डोअर टू डोअर प्रचारावर भर देत त्यांनी आपला अजेंडा मतदारांपर्यंत पोहचवला. यावेळी मंदार केसरकर यांसह त्यांचे समर्थक उपस्थित होते.