
सावंतवाडी : विलवडे गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली मंदिरातील फंडपेटी अज्ञाताकडून फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. चोरट्याने फंडपेटी बाहेर आणून फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला त्यात यश न मिळाल्याने त्याने पेटी तेथून टाकून पोबारा केला. फंडपेटीतील रक्कम सुरक्षित मिळाल्याने चोरीची कोणतीही तक्रार बांदा पोलिसात दाखल करण्यात आली नाही.
आज सकाळी मंदिरातील फंडपेटी नजिकच्या रस्त्यावर टाकून पसार झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे विलवडे परिसरात खळबळ उडाली. बुधवारी सकाळी सुभाष दळवी आपल्या शेताकडे जात असतानाच त्यांना रस्त्यालगत ही फंडपेटी दिसली. ही फंडपेटी माऊली मंदिरातील असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर देवस्थान कमिटी अध्यक्ष बाळकृष्ण, दळवी सरपंच प्रकाश दळवी, सुरेश सावंत आदींसह देवस्थानच्या मानकऱ्यांनी मंदिराकडे धाव घेतली. दोन महिन्यापूर्वीच या देवस्थानच्या मंदिरात पाच दिवसांचा कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा झाला होता. भाविकांचीही या मंदिरात वर्दळ असते. त्यामुळे या फंडपेटीमध्ये सुमारे ५० हजाराहून अधिक रक्कम असल्याची शक्यता देवस्थान मानकऱ्यानी व्यक्त केली होती. चोरीची घटना घडल्यानंतर बीट अंमलदार श्री तेली, पोलीस कॉन्स्टेबल बाळकृष्ण गवस, श्री नाईक तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
त्यावेळी फंडपेटी सुरक्षित असल्याचे निदर्शनास आले. फंडपेटी फोडून खात्री केली असता आतमधील रक्कम सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले. चोरट्याने चोरीचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र त्याला पेटी फोडता आली नाही. पेटीतील सर्व पैसे सुरक्षित मिळाल्याने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नाही.