विलवडे धरण झालं प्लास्टिक मुक्त ; उपक्रमाचं कौतुक

Edited by: विनायक गावस
Published on: June 24, 2023 12:09 PM
views 100  views

सावंतवाडी : विलवडे धरणात साचलेला प्लास्टिक कचरा, तसेच प्लास्टिक व काचेच्या बॉटल गोळा करुन हे धरण प्लास्टिक मुक्त करण्यात आले. धरण कोरडे पडल्यानंतर राबविण्यात आलेल्या या स्वच्छता मोहीमेचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही स्वच्छ्ता मोहिम एस आर दळवी फाउंडेशन ग्रामपंचायत विलवडे ग्रामपंचायत, जलसंधारण विभाग आणि राजा शिवाजी विद्यालय यांच्यासंयुक्त विद्यमाने राबविण्यात आली.

एस आर दळवी फाउंडेशनचे संस्थापक रामचंद्र उर्फ आबा दळवी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण विलवडे गावात प्रत्यक्ष कृतीसह स्वच्छता व प्लास्टिक निर्मूलन जागृती मोहीम राबवून फत्ते केली होती. त्यानंतर आता विलवडे धरण कोरडे पडल्यानंतर धरण परिसरातही प्लास्टिक व कचरा मुक्ती मोहीम राबवून एक वेगळा आदर्श सर्वांसमोर  ठेवला आहे. आबा दळवी यांनीही या मोहिमेचे कौतुक केले.

या स्वच्छता मोहिमेत विलवडे हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक मुकुंद कांबळे, सुहास बांदेकर, अमित पालव, वनसिंग पडवी, लिपिक गौरव दळवी, कर्मचारी बाबाजी ठाकूर, प्रकाश कदम, बाबु दळवी यांच्यासह विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी पर्यावरण रक्षणासाठी एस आर दळवी फाउंडेशनच्यावतीने धरणाच्या काठावर विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.

 यावेळी प्रकाश दळवी यांनी ही मोहीम राबविल्याबद्दल सर्वांचे आभार मानून स्वच्छतेचा हा जागर पुढे अखंडपणे राहण्यासाठी एस आर दळवी फाउंडेशनच्यावतीने यापुढेही गावातील प्रत्येक वाडीमध्ये आठवड्यातील एक दिवस स्वच्छता मोहीम राबविण्यात असल्याचे जाहीर करून यात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी एस आर दळवी फाउंडेशनचे विलवडे गावातील समन्वयक तथा सरपंच विलवडे प्रकाश दळवी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी रामचंद्र धोत्रे, राजा शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक बुध्दभुषण हेवाळेकर आदी उपस्थित होते.