
सावंतवाडी : माडखोल केंद्र शाळेचे पदवीधर शिक्षक विलास फाले यांना जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट, गुणवंत व आदर्श शिक्षक पुरस्कार पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. यावेळी जि प. सीईओ रवींद्र खेबुडकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी गणपती कमळकर, सौ फाले, केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
कुडाळ तालुक्यातील कुपवडे गावचे सुपुत्र विलास फाले यांनी आपल्या शिक्षकी पेशाची सुरुवात३ डिसेंबर १९९९ रोजी शिरशिंगे गोठवेवाडी या शाळेतून केली. या शाळेत सुमारे १२ वर्षे सेवा बजावल्यानंतर माडखोल धवडकी शाळा नं. २ मध्ये ३ वर्षे विद्यादानाचे पवित्र कार्य केले. त्यानंतर पुन्हा त्यांनी शिरशिंगे शाळा नं. १ या शाळेत ५ वर्षे सेवा बजावली. ही शाळा लोकसहभागातून डिजीटल बनविण्यात पुढाकार घेतला. त्यानंतर तिरोडा शाळा नं. १ मध्ये ४ वर्षे प्रभारी मुख्याध्यापक असताना लोक सहभागातून या शाळेचा चेहरा-मोहराच बदलला. जि. प. चे तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी याची दखल घेऊन त्यांचे विशेष कौतुक केले होते. त्यानंतर मे २०२३ मध्ये त्यांची माडखोल केंद्र शाळा नं १ मध्ये बदली झाल्यानंतर या शाळेतही अल्पावधीतच त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवून विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले. आपल्या आई-वडिलांसह सर्व गुरुजन व माडखोल केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे आपल्या शैक्षणिक कारकिर्दीला निर्णायक वळण मिळाल्याचे ते आवर्जून सांगतात. त्यामुळेच त्यांना आज जिल्हास्तरावर उत्कृष्ट शिक्षक हा सन्मान प्राप्त झाला. आपल्या कामाशी असलेला प्रामाणिकपणा, सर्जनशीलता, कल्पकता व अनुभव यामुळेच आपल्या २५ वर्षाच्या शैक्षणिक काळात सेवा बजावलेल्या प्रत्येक शाळेत त्यांनी स्व:ताची एक वेगळी ओळख निर्माण केली.
सध्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेले त्यांचे अनेक विद्यार्थी आज मोठ्या अभिमानाने त्यांचे नाव घेतात. ते उक्तीपेक्षा कृतीवर विश्वास ठेवणारे आहेत. त्याचा नम्र स्वभाव, आदरयुक्त वर्तन, मिटनेटके कामकाज, शाळेत - वेळेआधी उपस्थित राहणे, विद्याथ्यार्थ्यांना जास्तीत जास्त वेळ देणे, पालकांशी सतत संपर्क ठेवणे, क्रिडा स्पर्धामध्ये मुलांना उत्कृष्ट मार्गदर्शन व निर्विवाद पंचगिरी आणि आर्थिक पारदर्शकता राखणे या त्यांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांचे वेगळेपण दिसून येते. विद्यादानाचे हे व्रत यापुढेही अधिक जोमाने जोपासुन आपल्या स्वप्नातील आदर्श विद्यार्थी अजून कसा सक्षम करता येईल यासाठी अधिक काम करण्याची त्यांची इच्छा आहे. आपल्या आजपर्यंतच्या प्रवासात आईवडिल, सर्व गुरूजन, सर्व जेष्ठ बंधू, पत्नी, मुले, सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक, शाळेतील विद्यार्थी, शालेय व्यवस्थापन समिती यांचा आपल्या यशामध्ये सिंहाचा वाटा असून किंबहुना हे यश हे केवळ माझे नसून या सर्वांचे असल्याचे त्यानी सांगितले. त्यामुळे अशा या गुणी, शिस्त व विद्यार्थीप्रिय शिक्षकाचा त्यांच्या शैक्षणिक कार्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर झालेला हा सन्मान त्यांच्या दैदिप्यमान शैक्षणिक कारकिर्दीतील सर्वोच्च क्षण आहे.