
सावंतवाडी : जिल्हा परिषद निवडणूक २०२६ मध्ये माजगाव मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजयी होऊन शिक्षण व कृषी समितीचे सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संस्थेच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांचा संस्थेकडून गौरव करण्यात आला. राणी पार्वती देवी हायस्कूल येथे आज अभिनंदन कार्यक्रमात शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी व राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला.
राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे सचिव व्ही. बी. नाईक, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, खजिनदार सी.एल. नाईक, चंद्रकांत सावंत, अमोल सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, कै. भाईसाहेब सावंत, कै. विकास सावंत यांचा वारसा विक्रांत सावंत यांना लाभला आहे. अनेक नेत्यांसोबत काम करण्याच भाग्य मला लाभल असून कै. अजित पवार यांच्या कामाचा धडाका जनसामान्यांसाठी केलेले काम बघता आपणही याच पद्धतीने काम करावे. पुढच्यावेळी प्रचाराला जाण्याची गरज भासता नये असं काम आपल्या हातून घडावे, जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंत आपण मजल मारावी अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. तर शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनीही शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, विक्रांत सावंत यांचा स्वभाव, समाजासाठी असलेला त्यांचा आदर बघता त्यांची प्रगती निश्चितच होईल. आज कै. विकास सावंत या सत्काराला उपस्थित असायला हवे होते. त्यांना फार आनंद झाला असता. विक्रांत सावंत यांच्यात जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याची क्षमता आहे. त्यांनी मोठी स्वप्नं पहावीत. माझं स्वप्न आमदारकीच आहे, त्यामुळे स्वप्न मोठी बघावी. मी आमदार झाल्यानंतर त्यांनी आमदारकीच स्वप्न बघावं. त्यांचे भविष्य उज्ज्वल असून कै. विकास सावंत यांना अपेक्षित काम त्यांच्या हातून घडेल असा विश्वास श्री. परब यांनी व्यक्त केला.
दरम्यान, अमोल सावंत, वसुधा मुळीक, प्रा. केदार म्हसकर, दशरथ शृंगारे यांसह प्राध्यापकांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना विक्रांत सावंत यांनी ऋण व्यक्त केले. ज्येष्ठांचे आशीर्वाद, मतदारांचे प्रेम अन् कुटुंबाची पुण्याई यामुळे हा विजय प्राप्त झाला. माझ्या पदाचा फायदा जनसामान्यांच्या कल्याण्यासाठी होईल असा विश्वास श्री. सावंत यांनी व्यक्त केला. यानंतर प्रा. रूपेश पाटील यांनी विक्रांत सावंत यांची प्रकट मुलाखत घेतली. याप्रसंगी सोनाली सावंत, के.टी. परब, नारायण देवरकर, वसुधा मुळीक, सीमा मठकर, संप्रवी कशाळीकर, डॉ. सुमेधा नाईक-धुरी, नामदेव मुठे, जगदीश धोंड, मेघश्याम काजरेकर, अर्चना सावंत आदींसह संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संप्रवी कशाळीकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मिलिंद कासार तर आभार डॉ. सुमेधा नाईक-धुरी यांनी मानले.










