
पंपावर अख्ख्या गावाची लाईट वापरली जाते का ? : गौरव मुळीक
सावंतवाडी : नळ योजनेसाठी ग्रामपंचायतीत बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरच्या दुप्पट बीलांवरून उपसभापती गौरव मुळीक यांनी आक्रमक पवित्रा घेतला. माझंही बॅगग्राऊंड इलेक्ट्रिक आहे, सगळ्यांसमोर सगळं काढायला लावू नका. स्मार्ट मीटर फेल गेल्याचे चित्र ६३ ग्रामपंचायतीत दिसत आहेत. पंपावर अख्या गावाची लाईट वापरली जाते का ? असा सवाल उपसभापती गौरव मुळीक यांनी केला.
सावंतवाडी पंचायत समितीची मासिक बैठक येथील जनरल जगन्नाथराव भोसले विद्यामंदिरच्या सभागृहात पार पडली. यावेळी महावितरणच्या कारभारावरून पं.स.सदस्यांसह उपसभापतींनीही आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी श्री. मुळीक म्हणाले, नळ योजनेसाठी स्मार्ट मीटर बसवल्यानंतर ग्रामपंचायतीत बील वाढण्याचे प्रकार होत आहेत. मीटरला झीरो रिडींग जाऊन ९० हजार बील येत आहे. ५ हजार बील येत तिथे ६५ हजार आल, ६३ ग्रामपंचायतींचा हा विषय आहे माझंही बॅगग्राऊंड इलेक्ट्रिक आहे, सगळ्यांसमोर सगळं काढायला लावू नका. स्मार्ट मीटर फेल गेल्याचे चित्र दिसत आहेत. पंपावर अख्या गावाची लाईट वापरली जाते का ? सक्ती करून तुम्ही मीटर लावलेत. मात्र, त्याला नेटवर्कच नाही तर ते मीटर काम कसे करणार ? असा सवाल उपसभापतींनी केला. महावितरण अधिकाऱ्यांना त्यांनी खडेबोल सुनावले, वरिष्ठ फोन उचलत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी श्री. राक्षे यांनी याबाबत वरिष्ठांचे लक्ष वेधतो असे आश्वासन दिले.
दरम्यान, उप अभियंता सभागृहात खोटी माहिती देतात. त्यामुळे तालुक्यात कुठे काम सुरू आहे ती माहिती द्या, पावसात लाईट गेली तर तुम्हाला कोंडून ठेवणार असा इशारा पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी दिला. तर शहरात काम सूरू आहे मग, ग्रामीण भागातील लाईट का जाते ? असा सवाल सदस्य प्रशांत सुकी यांनी केला. तसेच धनश्री मराठे यांनी देखील मळेवाड येथील विद्युत पुरवठा खंडित होण्यावरून जाब विचारला. तसेच प्राजक्ता केळुसकर, महेश धुरी, उदय पारिपत्ये, शरद धाऊसकर, मायकल डिसोजा, प्रथमेश सावंत आदींनी देखील ग्रामीण भागातील वीज समस्यांवरून उप अभियंतांना धारेवर धरले. यावेळी पोल बदलण्याचे काम सुरू आहे. अतिरिक्त पोलची मागणी आम्ही केली आहे. २५० पोल सावंतवाडीत येणार आहेत. पावसाळ्यापूर्वी हे पोल बसविण्यात येथील असे उपअभियंता श्री. राक्षे यांनी सांगितले. ग्रामीण भागात लो व्होल्टेजचा प्रोब्लेम राहत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी उपसभापती गौरव मुळीक यांनी विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारावरून दीड महिन्यात ३३ केव्ही, ११ केव्हीच काम पूर्णत्वास आणा असे निर्देश दिले. तसेच आतापर्यंत तालुक्यात नव्याने बसविण्यात आलेल्या ट्रान्सफॉर्मरबाबत माहिती द्या असेही सांगितले. पावसाळ्यापूर्वी सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी आदेश दिले. तर ग्रामपंचायतीना येणाऱ्या अतिरिक्त बीलांबाबत उपाययोजना करण्याची सुचना गटविकास अधिकारी श्री. नाईक यांनी महावितरणला दिली. यावेळी सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक आदींसह पंचायत समिती सदस्य, विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.










