
सिंधुदुर्गनगरी : ओरोस जाधववाडी येथे श्री देवी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव उत्साहात साजरा होणार असून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगतदार मेजवानी भाविकांना अनुभवायला मिळणार आहे. २७ आणि २८ एप्रिल २०२६ रोजी हा उत्सव पार पडणार असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
उत्सवाची सुरुवात सोमवार, २७ एप्रिल रोजी होम व हवनाने होणार आहे. यानंतर सायंकाळी ७ वाजता सावरेश्वर दशावतार नाट्य मंडळ, आवेरे (वेंगुर्ला) यांच्याकडून “महिमा लक्ष्मी नारायणाचा” या महान पौराणिक दशावतार नाटकाचे सादरीकरण होणार आहे. या नाट्यप्रयोगाची रसिकांना विशेष उत्सुकता लागली आहे.
मंगळवार, २८ एप्रिल रोजी सकाळी प्रार्थना, आरती आणि जोगवा मागण्याचा पारंपरिक कार्यक्रम होईल. सायंकाळी ७ ते १० या वेळेत महाप्रसाद, मांड भरणे, ओट्या भरणे आणि नवस बोलणे असे धार्मिक विधी पार पडतील. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कारही करण्यात येणार आहे.
या उत्सवानिमित्त परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त करतात. त्रैवार्षिक गोंधळ उत्सव हा स्थानिकांसाठी श्रद्धा आणि परंपरेचा महत्त्वाचा सोहळा मानला जातो.
या उत्सवात जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होऊन श्री देवी भवानी मातेचे दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन देवस्थान समितीचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी केले आहे.










