अधिकारी सभेला येत नसतील तर आम्ही कशाला यायचं ? : मंगेश लोके

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: April 23, 2026 12:46 PM
views 38  views

वैभववाडी : मागील सभेत सूचना देऊनही विविध खात्यांचे अधिकारी व खातेप्रमुख पंचायत समितीच्या मासिक सभेला उपस्थित राहत नसल्याने सदस्यांनी संताप व्यक्त केला. “अधिकारी सभेला येत नसतील तर आम्ही सभेला कशाला यायचं?” असा सवाल पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांनी उपस्थित केला.

वैभववाडी पंचायत समितीची मासिक सभा येथील वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह सभागृहात उपसभापती साची कोलते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेच्या प्रारंभी मागील सभेतील सूचनांचे वाचन सुरू असताना हा विषय पुन्हा चर्चेत आला.

यावेळी श्री लोके यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना सांगितले की, पंचायत समितीचे अधिकारी वगळता अन्य विभागांचे अधिकारी या सभेला गैरहजर आहेत. मागील सभेत संबंधित खातेप्रमुखांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र, यावेळीही तेच चित्र दिसून आले.“आम्ही तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन सभेला येत असतो. अधिकारीच उपस्थित राहत नसतील तर हे प्रश्न सुटणार कसे?” असा सवाल करत अशा अधिकाऱ्यांविरोधात कठोर निर्णय घ्यावा, अशी मागणी श्री. लोके यांनी केली.

या विषयाला अनुसरून सदस्या सुवर्णा संसारे यांनीही सभागृहाचे लक्ष वेधले. “सभापती सभेला उपस्थित राहू शकत नसल्यास पत्र देतात, मग अधिकारी तसे पत्र का देऊ शकत नाहीत?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.