मधुमित्र–मधुसखी पुरस्कारासाठी नामांकने भरण्याचे आवाहन

Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: April 23, 2026 13:34 PM
views 27  views

सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने सन २०२६ साठी “मधुमित्र” व “मधुसखी” पुरस्कारांसाठी नामांकने मागविली आहेत. तरी इच्छुकांनी आपली नामांकने दि. ४ मे २०२६ पूर्वी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावीत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.

मंडळाच्या वतीने गेल्या 3 वर्षापासून ही पुरस्कार योजना सुरु करण्यात आली आहे.  मधमाशी पालन व्यवसायास गती मिळावी व मधपालनास प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाने हा उपक्रम सुरु केला आहे. मधमाशी पालनात अनेक वर्ष काम करणाऱ्या यशस्वी मधपालांना प्रथम/द्वितीय/तृतीय क्रमांकाचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये एक पुरस्कार महिला मधपाळासाठी राखीव ठेवण्यात आला आहे.  पुरस्काराची रक्कम प्रथम क्रमांकासाठी रु. ११,०००, द्वितीय क्रमांकासाठी रु. ७,००० आणि तृतीय क्रमांकासाठी रु. ५,००० अशी आहे.

दि. २० मे २०२६ रोजी ‘जागतिक मधमाशी दिना’चे औचित्य साधून पुणे जिल्ह्यात आयोजित जाहीर समारंभात हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी अर्ज www.mskvib.org  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.  तसेच प्रत्येक जिल्ह्यात खादी मंडळाच्या जिल्हा कार्यालयातही नामांकन अर्ज मिळणार आहेत.

अधिक माहितीसाठी  जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, जिल्हा कार्यालय क्र. ९४२२५९५१६२, मधूक्षेत्रिक क्र. ९९७५४६८४३९  संपर्क साधावा.