दोडामार्गात आलेली विकासगंगा शिवसेनेमुळेच : नौटंकीपणा थांबवा !

गणेशप्रसाद गवस यांनी पत्रकार परिषदेत घेतला विरोधकांचा समाचार
Edited by: संदीप देसाई
Published on: February 19, 2023 20:48 PM
views 199  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात जी कोट्यावधींची काम झाली ती शिवसेनेमुळे झालेली आहेत. त्यामुळे विरोधकांनी त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. सातत्याने भेडशील प्राथमिक आरोग्य केंद्र लोकार्पणाचा जो नौटंकीपणा केला जात आहे, त्याला ज्या ठेकेदाराने हे इमारत पूर्ण करण्यासाठी ५ वर्ष लावली तोच जबाबदार असून आता तोच विरोधकांना पुढे काढत आहे, या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत असून लवकरच बाळासाहेबांची शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व या मतदारसंघाचे आमदार व मंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली या प्राथमिक आरोग्य केंद्राचे रीतसर लोकार्पण करणार असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख गणेश प्रसाद गवस यांनी दिली.  

ते दोडामार्ग येथे शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांचे समवेत विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष प्रेमानंद देसाई, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, युवा कार्यकर्ते शैलेष दळवी, तालुका संघटक गोपाळ गवस, दादा देसाई, युवा सेना  भगवान गवस, झरेबांबर सरपंच अनिल शेटकर, संदिप गवस, लाडु आयनोडकर कार्यालयप्रमुख गुरुदास सावंत बाजीराव देसाई व शिवसैनिक उपस्थित होते. 

यावेळी सर्वप्रथम श्री. गवस यांनी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व चिन्ह बाबत दिलेल्या निर्णयाचा जोरदार स्वागत केलं. शिवसेना पक्षाला मिळालेला धनुष्यबाण, त्यामुळे आम्हा बाळासाहेबांच्या शिवसैनिकात एक नवचैतन्य निर्माण झालं असून पक्षाचे नाव व चिन्ह सोबत घेत दोडामार्ग तालुक्यात शिवसेना अधिक मजबूत बळकट करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याचवेळी तालुक्याची विविध विकास कामे मंजूर झाले आहेत, त्यांची भूमिपूजन सुद्धा शिवसेना पक्षाचे पदाधिकारी करणार असल्याचेही ते म्हणाले.


या विविध विकास कामांची माहिती देताना त्यात प्रामुख्याने दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालय 22 कोटी रुपये, नगरपंचायत इमारत २ कोटी रुपये, पंचायत समिती इमारत 5.5 कोटी रुपये, दोडामार्ग क्रीडा संकुल ३.५ कोटी रुपये, तसेच खोक्रल, झरेबांबर, हेवाळे, मेढे येथे मंजूर झालेल्या विविध पूलांची भूमिपूजन सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थित होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. इतकंच नव्हे तर शिंदे गटाची शिवसेना संपणार म्हणणारे खऱ्या अर्थाने आज संपले आहेत, हे नुकताच निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निकालातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांनी उगाच नौटंकी करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला गणेशप्रसाद गवस यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला दिला आहे.