सिंधुदुर्ग वारकरी संप्रदायाचा ज्येष्ठ वारकरी पुरस्कार जाहीर

४५ वर्षांच्या वारकरी सेवेबद्दल पोखरण येथील विजयसिंग तावडे यांचा सन्मान
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: December 23, 2025 15:12 PM
views 19  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचा प्रतिष्ठेचा सिंधुदुर्ग ज्येष्ठ वारकरी पुरस्कार यावर्षी गेली ४५ वर्षे अखंड वारकरी सेवा करणारे पोखरण तालुका कुडाळ येथील ज्येष्ठ वारकरी विजयसिंग बळीराम तावडे (वय ८५) यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार गुरुवार, २५ डिसेंबर रोजी वारकरी संप्रदायाच्या वतीने ओरोस येथील रवळनाथ मंदिरात होणाऱ्या वारकरी मेळाव्यात प्रदान करण्यात येणार आहे.

२१ ते २५ डिसेंबर या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने रवळनाथ मंदिर येथे श्री गणराज ज्ञानेश्वरी सामूहिक पारायण सुरू असून, या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२५ डिसेंबर रोजी आयोजित वारकरी मेळाव्यात सकाळी ९ ते १० या वेळेत वारकरी दिंडी, सकाळी १०.३० ते १२ या वेळेत ह.भ.प. निवृत्ती महाराज मेस्त्री यांचे कीर्तन होणार आहे. दुपारी १२.३० ते १ या वेळेत वारकरी दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात येणार असून, दुपारी १ वाजता संत सेवा पुरस्कार सोहळा संपन्न होईल. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.