सर्वांना सोबत घेऊन काम करणार !

नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसलेंनी स्वीकारला पदभार
Edited by: विनायक गांवस
Published on: December 23, 2025 15:53 PM
views 124  views

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांनी मला नगराध्यक्षपदाची उमेदवारी देऊन माझ्यावर विश्वास टाकला. भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह सावंतवाडीकर जनतेला माझ्या विजयाच श्रेय जातं. सावंतवाडीकरांनी आम्हाला निवडून देत आशीर्वाद व प्रेम दिले. नागरिकांचे हे प्रेम व विश्वास निश्चितच सार्थकी लावू व आगामी पाच वर्षात सावंतवाडी शहराला एक 'ग्लोबल सिटी ' म्हणून विकसित करू, असा विश्वास सावंतवाडीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे सावंत भोंसले यांनी व्यक्त केला. 

श्रद्धाराजे भोंसले यांनी आज युवराज लखमराजे भोसले यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व सर्वच नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सावंतवाडी शहराच्या विकासाबाबत आपले व्हिजन मांडले.  त्या म्हणाल्या, सावंतवाडी संस्थान म्हणून आमच्या राजघराण्याने या शहरासाठी फार मोठं योगदान दिलं आहे. आता लोकप्रतिनिधी या नात्याने राजघराण्याचे लोकसेवेचे ते व्रत कायम राखणार. सावंतवाडी शहराला अधिक सुंदर व विकसित शहर म्हणून नावारूपाला आणण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करणार. देशात व राज्यात महायुती आहे. त्यामुळे या ठिकाणीही आम्ही महायुती म्हणूनच काम करणार, असेही त्यांनी स्पष्ट केले.      

सावंतवाडी शहराला ऐतिहासिक वारसा आहे. त्या शहराला एक वेगळी संस्कृती लाभली आहे. त्यामुळे या शहराची संस्कृती कायम राखत  Al सारख्या नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना अपेक्षित असा शहराचा विकास साधणार, महिलांना अधिक सुरक्षीत व आत्मनिर्भर करण्यावर माझा भर असेल‌. सावंतवाडीचा विकास हे माझं ध्येय असून त्यासाठीच काम करणार अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. 

दरम्यान, हा माझा विजय नसून हा भारतीय जनता पार्टीचा विजय आहे. भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा हा विजय आहे. सावंतवाडीतील  नागरीकांनी टाकलेला विश्वास नक्कीच सार्थकी लावणार, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. शहराच्या विकासासोबतच शहरातील महिलांच्या सुरक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण पावले उचलली जातील. लोकप्रतिनिधी या नात्याने सावंतवाडी नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन  एकत्रितपणे काम केले जाईल. कर्मचाऱ्यांना उद्भवणाऱ्या समस्या देखील दूर केल्या जातील व त्यांच्या साथीने या शहराचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धाराजे सावंत भोंसले यांनी आज आपल्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. पुण्यश्लोक बापुसाहेब महाराज व शिवरामराजे भोंसलेंचा आशीर्वाद घेत त्यांनी नगरपरिषद सभागृहात प्रवेश केला. खास फुलांच्या पायघड्या घालत पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी वर्गाकडूनही त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी त्यांचे स्वागत केले.   

नगराध्यक्षा व नगरसेवकांचे स्वागत करीत आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना जनतेच्या अपेक्षांचं ओझं व दबाव असेल. हा काटेरी मुकूट डोक्यावर घेऊन काम करायचं असतं. नागरीकांच्या अपेक्षा पूर्ण करायची जबाबदारी आपल्यावर आहे. आपापल्या प्रभागातील जनतेचा आवाज बनून काम करा. जून्या व अनुभवी नगरसेवकांच्या अनुभवाचा फायदा होईल. तर नगराध्यक्षा संपूर्ण राज्यातच नव्हे तर देशभरात या सावंतवाडी शहराचा नावलौकीक करतील, असा विश्वास व्यक्त केला. या सभागृहाला १५० वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा कायम राखत  इतरांच्या विचारांचाही सन्मान करून काम करा. अधिकाऱ्यांना सहकारी समजून काम करा. कागदावर सर्व योजना सुंदर दिसतात मात्र त्या प्रत्यक्ष जमीनीवर राबवताना समन्वय साधून काम केल्यास विकास होईल अन्यथा तो फाईल बंद होईल. निवडणूका नजरेसमोर नाही तर शहराचा शाश्वत विकास नजरेसमोर ठेवून काम करावा. दुरदृष्टी चा विचार करून निर्णय घ्या. शहरीकरण वाढत आहे. शहरं मजबूत व विकसित झाली तर देश विकसित होईल हा विचार करून सर्वांनी सर्वांना सोबत घेऊन कारभार करूया, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, ॲड. अनिल निरवडेकर, प्रतिक बांदेकर, दीपाली भालेकर, ॲड. निलम नाईक, मोहिनी मडगांवकर, वीणा जाधव, दुलारी रांगणेकर, सुनिता पेडणेकर, सुकन्या टोपले यांचेही प्रशासनाने स्वागत केले. तसेच या सर्व नगरसेवकांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षां चे अभिनंदन करीत आपल्या भावी वाटचालीबाबत मनोगत व्यक्त केले. सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा  शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक संजू परब यांसह शिवसेनेच्या इतर नगरसेवकांनीही नवनिर्वाचित नगराध्यक्षांचं स्वागत केलं. यावेळी नगरसेवक बाबू कुडतरकर, अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, ॲड. सायली दुभाषी, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक आदी उपस्थित होते. तर काँग्रेसचे नगरसेवक तौकीर शेख व उबाठा गटाचे नगरसेवक देवेंद्र टेमकर यांनीही नवनिर्वाचित नगराध्यक्षांचे स्वागत व अभिनंदन केले. प्रशासनाकडून त्यांनाही सन्मानित करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक राजू बेग, मनोज नाईक, ॲड. परिमल नाईक  भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी विनोद राऊळ, अमित परब, दिलीप भालेकर, चंद्रकांत जाधव, केतन आजगांवकर, रवी जाधव आदींनी नवनिर्वाचित नगराध्यक्षांना सन्मानित केले. तसेच शिवसेनेच्या माजी नगरसेविका भारती मोरे, संजय पेडणेकर, शिवसेनेचे पदाधिकारी क्लेटस फर्नांडिस यांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकारी पुंडलिक दळवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नगराध्यक्षांचे स्वागत केले.यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.