
सिंधुदुर्गनगरी : कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्या, सावंतवाडी टर्मिनल व जंक्शनचा प्रश्न तसेच रेल्वे स्थानकांवरील अपुऱ्या सोयीसुविधांबाबत माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्याशी चर्चा करून या सर्व प्रश्नांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिले.
तसेच सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाला जोडणारे आणाव व रानबांबुळी येथील ॲप्रोच रोड तात्काळ काढण्याबाबत कोकण रेल्वेचे विभागीय अधिकारी शैलेश बापट यांच्याशी चर्चा करून येणाऱ्या आठवडाभरात कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांवरील विविध समस्यांबाबत भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची भेट घेण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील दहाही रेल्वे स्थानकांच्या समस्या, प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी व आवश्यक सोयीसुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या सर्व प्रश्नांचे निरसन कोकण रेल्वेच्या वरिष्ठ पातळीवर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन सावंत यांनी दिले.
यावेळी कोकण रेल्वे प्रवासी समन्वय व संघर्ष समितीचे सचिव अजय मयेकर, कार्याध्यक्ष शुभम परब, मीडिया प्रसिद्धी प्रमुख संजय वालावलकर, सहखजिनदार जयेंद्ररथ परब, आणाव पोलीस पाटील सुनील पाटकर, सिंधुदुर्ग रेल्वे स्थानक समितीचे सहसचिव राहुल शिर्के, समितीचे सल्लागार पंडित माने सर तसेच सुकळवाडचे सरपंच किशोर पेडणेकर उपस्थित होते.
समितीच्या माध्यमातून यापूर्वीही खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे व भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांना निवेदन देण्यात आले होते. त्यामध्ये जिल्ह्यातील दहाही स्थानकांवर जलद गाड्यांना थांबा देणे, नांदगाव, वैभववाडी व सिंधुदुर्ग स्थानकांवर पीआरएस तिकीट प्रणाली सुरू करणे, तसेच मडुरे ते खारेपाटण दरम्यान धावणाऱ्या काही जलद गाड्यांना निश्चित स्थानकांवर थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्ग स्थानकावर आणि कणकवली स्थानकावर प्रत्येकी दोन गाड्यांना थांबा मिळाला असून, उर्वरित स्थानकांवरही ३५ पैकी काही गाड्या थांबाव्यात, अशी प्रवासी संघटनेची मागणी आहे.
याशिवाय आर्चीर्णे, मडूरे यांसारख्या काही स्थानकांवर जाण्यास रस्ता नसणे, प्रवाशांसाठी बाकडे, चहाची टपरी व मूलभूत सुविधांचा अभाव, तसेच खारेपाटण स्थानकावर प्लॅटफॉर्म उंच नसल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
वाढती गर्दी लक्षात घेता कोकण कन्या रेल्वे गाडी शिवाजी टर्मिनस किंवा दादर येथून स्वतंत्रपणे सोडावी, अशी मागणीही जोर धरत आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सावंतवाडी टर्मिनलच्या प्रश्नाऐवजी मडूरे येथे जंक्शन किंवा टर्मिनल उभारण्याच्या दृष्टीने जागा संपादन करण्यात आले आहे.
रेल्वेसाठी जमीन दिलेल्या कोकणी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना रेल्वेत नोकऱ्या न देता परजिल्ह्यातील व परराज्यातील लोकांना संधी दिल्याचा आरोप मडूरे येथील सुरेश गावडे यांनी सातत्याने केला असून, या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.











