येत्या काळात कोकण महाराष्ट्राच्या विकासाचा गेट वे

विधानसभाध्यक्ष अॅड.राहुल नार्वेकर यांचं वक्तव्य
Edited by: विनायक गांवस
Published on: January 18, 2025 17:00 PM
views 123  views

सावंतवाडी : येणाऱ्या काळात कोकण हा महाराष्ट्राच्या विकासाचा गेट वे असेल अधिकची गुंतवणूक येईल असा विश्वास महाराष्ट्राचे विधानसभाध्यक्ष अॅड.राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला. विधानसभा अध्यक्ष म्हणून योग्य निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा मला पत्रकारांनी मोठी साथ दिली. लोकशाहीच्या तीन स्तंभांवर जागृतपणे पत्रकार लक्ष ठेवत आहेत. त्यामुळे लोकशाही अधिक बळकट होत असल्याचे गौरवोद्गार ही नार्वेकर यांनी काढले.

सिंधुदुर्ग प्रेस क्लबच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा सावंतवाडीतील काझीशहाबुददीन हाॅल मध्ये विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी,जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, सिंधुदुर्ग प्रेस क्लबचे संस्थापक सिताराम गावडे, सिंधुदुर्ग प्रेस क्लबचे अध्यक्ष अनंत जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी सावंतवाडी चे सुपुत्र अँड राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली म्हणून प्रेस क्लबच्या वतीने आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते मानपत्र देऊन नागरी सत्कार करण्यात आला.

तर  प्रेस क्लब भुषण पुरस्काराने रूपेश हिराप,डिजिटल मिडीयात आर्दश पत्रकार  आनंद धोंड,युवा पत्रकार म्हणून प्रतिक राणे, प्रेस क्लब कर्मचारी पुरस्काराने गुरुनाथ कदम यांचा तर विशेष पत्रकार पुरस्कार शिवप्रसाद देसाई, सिताराम गावडे यांना देऊन गौरविण्यात आले.

यावेळी नार्वेकर म्हणाले, कोकणातील लाल माती गुलालाचा शेंदूर असल्यासारखी वाटते. आम्ही या ठिकाणाहून मुंबई मध्ये गेलो तरी लाल मातीत येत असतो. कुलाबा क्षेत्रात देशातील श्रीमंत, उच्चभ्रू लोक राहतात आणि मंत्रालयासह उच्च न्यायालय देखील आहेत. अशा बहुभाषिक कुलाबा मतदारसंघातून निवडून येतो म्हणजे कोकणी माणूस सर्वांना आपलेसे करतोय. विधानसभा अध्यक्ष हा काटेरी मुकुट माझ्या हातात असला तरी कोकणातील माणूस तो सांभाळत आहे.  पत्रकार हा  चौथा स्तंभ आहे . तो अन्य तिन्ही स्तंभांवर कायमच जागृतपणे लक्ष ठेवत आहे. पत्रकारांनी चांगली साथ दिली म्हणूनच मी अध्यक्ष म्हणून योग्य निर्णय घेतले. देशाला घडविण्यात आणि लोकशाही ला पुढे नेण्यासाठी पत्रकार काम करत आहेत.असे अॅड.नार्वेकर म्हणाले.भविष्यात  कोंकणात रोजगार निर्माण होईल. सावंतवाडी, वेंगुर्ले पर्यटन हब म्हणून विकसित होईल. दीपक केसरकर यांनी जर्मन मध्ये चार लाख लोकांना नोकऱ्या देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.असल्याचे ही गौरवोद्गार काढले.

 केसरकर म्हणाले, बाळशास्त्री जांभेकर यांचा आदर्श सिंधुदुर्ग जिल्ह्यांला लाभला आहे.येथील पत्रकार नेहमीच जागरूक असतात असे ते म्हणाले. दळवी म्हणाले, महाराष्ट्र, देशात सिंधुदुर्ग जिल्ह्याला अग्रभागी ठेवण्याचे काम जिल्ह्यातील पत्रकार ठेवत आहेत. त्यामुळे जिल्ह्याची उज्वल परंपरा पुढे चालू आहे.असेही दळवी म्हणाले.

यावेळी प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, सागर साळुंखे, अन्नपूर्णा कोरगावकर अभिमन्यू लोढे अशोक दळवी, रमेश बोंद्रे, नारायण राणे,  रवींद्र मडगावकर, दिनेश गावडे, हेमंत खानोलकर,संदेश पाटील राकेश परब, राजू तावडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.